पॅनासॉनिककडून एसी विक्रीचा १० लाखाचा टप्पा पार
*  विद्युत उपकरण निर्मितीच्या क्षेत्रातील पॅनासॉनिकने वातानुकूलित यंत्र विक्रीचा देशातील १० लाख विक्रीचा टप्पा पार केला आहे. ऊर्जा संवर्धन आणि नाविन्याची कास धरत उपकरणांमध्ये वेळोवेळी अत्याधुनिकता आणण्याच्या कंपनीच्या प्रयत्नामुळे पॅनासॉनिकने सध्या १५ टक्के बाजारहिस्सा काबीज केला आहे. कंपनीचा बाजारहिस्सा २००८ मधील एक टक्क्यावरून अवघ्या दोन वर्षांत ६ टक्क्यांवर गेला होता. महाराष्ट्रासह गुजरात, तामिळनाडू आणि राजस्थानमध्ये कंपनी क्रमांक एकवर आहे. कंपनीने १२० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह चपटय़ा आकारातील यंत्राची बाजारपेठ २० टक्क्यांपर्यंत काबीज करण्याचे लक्ष निर्धारित केल्याचे कंपनीच्या गृहपयोगी उपकरण व्यवसायाचे विभागीय उप व्यवस्थापक सुरेशकुमार बंदी यांनी सांगितले.
कॅम्लिन फाइन सायन्सेसचा ३०% लाभांश
*  जागतिक स्तरावर खाद्य-उद्योगासाठी उपयुक्त रासायनिक घटकांच्या निर्मितीतील अग्रेसर कंपनी कॅम्लिन फाइन सायन्सेस लिमिटेडच्या संचालक मंडळाने आपल्या भागधारकांना २ रु. दर्शनी मूल्याच्या समभागावर ०.६० रुपये अर्थात ३० टक्के लाभांश वितरणाचा निर्णय जाहीर केला आहे. कंपनीने ३१ मार्च २०१३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांत एकूण विक्री महसुलात २६.१ टक्क्यांची वाढ करून तो ३३२.६८ कोटी रुपयांवर नेण्याच्या केलेल्या कामगिरीच्या पाश्र्वभूमीवर हा लाभांश जाहीर केला आहे. अस्थिर जागतिक बाजारस्थितीत कंपनीने विक्रीत केलेली वाढ उल्लेखनीय ठरली असून, कंपनीचा करपूर्व नफाही गेल्या वर्षांच्या तुलनेत ३७.०२ टक्क्यांनी वाढून २२.५३ कोटी रुपयांवर गेला आहे.