भारतात २०२२ पर्यंत ‘सर्वासाठी घरे’ व १०० स्मार्ट शहरे या कार्यक्रमांची आखणी सुरू असून, मोठी गुंतवणूक स्थावर मालमत्ता क्षेत्रात येणे अपेक्षित आहे. २०२० पर्यंत देशातील स्थावर मालमत्ता उद्योग १२,००० कोटी रुपयांच्या उलाढालीचा बनेल, परंतु त्याचवेळी या उद्योगात अडीच ते पावणे तीन कोटी प्रशिक्षित मनुष्यबळाची तूट राहण्याचा अंदाज आहे.
शेतीनंतर सर्वाधिक रोजगार पुरविणारे क्षेत्र असलेल्या स्थावर मालमत्ता उद्योग आज बहुतांशी अकुशल व कामचलाऊ लोकांच्या खांद्यावरून वाहिला जात आहे, अशी व्यथा रिअल इस्टेट मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट (रेमी)चे सह-संस्थापक व अध्यक्ष रोहन बुलचंदानी यांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केली. दरसाल जितकी गरज आहे त्या तुलनेत जेमतेम २० टक्केच मनुष्यबळ मिळते आणि वर्षांला ४० लाख या दराने प्रशिक्षित मनुष्यबळाचा अनुशेष वाढतच चालला असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्यक्ष गृहनिर्माण प्रकल्प, ब्रोकिंग कंपन्या, मालमत्ता विपणन, प्रबंधन, अनुसंधान कंपन्या, बँका व गृहवित्त कंपन्या, नियामक यंत्रणा, स्थावर मालमत्ता गुंतवणूक व साहस भांडवल कंपन्या या सर्वच ठिकाणी या क्षेत्राविषयी विविध पैलूंबाबत प्रशिक्षित व माहीतगारांचा मोठा तुटवडा आहे, असे ही दरी भरून काढण्यासाठी प्रशिक्षणक्रम राबविणाऱ्या ‘रेमी’चा कयास आहे.
प्रशिक्षितांच्या अभावी ग्राहक व विकासक दोहोंना विपरीत परिणाम भोगावे लागत असल्याचे बुलचंदानी यांनी सांगितले. गृहनिर्माण प्रकल्प विहित कालावधीपेक्षा अधिक लांबणे, ग्राहकांना वेळेवर सदनिकांचा ताबा न मिळणे, मोठी मागणी असूनही घरांची विक्री रखडणे व गुंतलेल्या पैशावर परतावा घटतो, असे त्यांनी सांगितले.
या क्षेत्राशी संबंधित व्यवहारांचे र्सवकष व आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रमाणपत्र धाटणीचे पाच तर सहा एक्झिक्युटिव्ह धाटणीचे व्यवसायाभिमुख कार्यक्रम रेमीच्या मुंबई व ठाणे येथील केंद्रातून सुरू आहेत. किमान एक आठवडा ते कमाल तीन महिने कालावधीचे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना १०० टक्के नोकरीची हमी तसेच प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्तीची सुविधाही उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी दोन वर्षांत देशस्तरावर प्रमुख शहरांत ५९ शाखा स्थापण्याचे तसेच बांधकाम मजुरांसाठीही प्रशिक्षणक्रम राबविण्याचे रेमीचे नियोजन आहे.
पदार्थ विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना मोठी मागणी
मुंबई : आधुनिक तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी विज्ञानातील प्रगतीच्या मिलापातून अनेक गोष्टी सुकर केल्या असल्या तरी पारंपरिक पदार्थ विज्ञान (मटेरियल सायन्स) या ज्ञानशाखेचे महत्त्व अबाधित असून, अशा विद्यार्थ्यांना जगभरात विविध उद्योगक्षेत्रांत मोठी मागणी आहे. कोणत्याही अभियांत्रिकी प्रक्रियेतून तयार करावयाच्या ढाच्याच्या रचनेसाठी वापरात येणारे पदार्थ-सामग्रीचे परीक्षण ही पूर्वअट असून, त्या ठिकाणी ही ज्ञानशाखा महत्त्वाची ठरते. निर्मिती क्षेत्र, तेल शुद्धीकरण प्रकल्प, धातू प्रक्रिया, परिवहन, बांधकाम, हवाई उड्डाण, संरक्षण क्षेत्र, औषधी निर्माण, गारमेंट, ऊर्जाक्षेत्र, जैवऔषधी क्षेत्रात मटेरियल सायन्स्टिस्टची मोठय़ा प्रमाणात मागणी असल्याचे अमेरिकास्थित मिसूरी स्टेट युनिव्हर्सिटी (एमएसयू) सांगितले. पदार्थ विज्ञानाचा चार वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम या विद्यापीठाने भारतीय विद्यार्थ्यांकरिता खुला केला आहे. http://international.missouristate.edu/india या संकेतस्थळावर तपशील व अर्ज उपलब्ध आहे.