वाणिज्य वाहनांना कर्जपुरवठा करणाऱ्या सर्वात मोठी कंपनी श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीने प्रत्येकी १००० रु. दर्शनी मूल्याच्या अपरिवर्तनीय कर्जरोख्यांच्या विक्रीतून २५० कोटींचा निधी उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. ७ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबरदरम्यान सुरू राहणाऱ्या या रोखेविक्रीचा चांगला भरणा झाल्यास आणखी २५० कोटींचे रोखे जारी करण्याचा पर्याय कंपनीपुढे खुला आहे. अशा तऱ्हेने या रोखेविक्रीतून कंपनीने ५०० कोटींचा निधी उभारणे अपेक्षित आहे.
चालू आर्थिक वर्षांत कंपनीकडून भांडवली बाजाराचा कल आजमावला जाण्याचा दुसरा प्रयोग असून, याआधी जुलैमध्ये कंपनीने ७५० कोटी रुपयांची रोखेविक्री केली आहे. श्रीराम ट्रान्सपोर्टचे व्यवस्थापकीय संचालक यू. जी. रेवणकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, यंदा चांगला पाऊस झाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होणे अपेक्षित आहे. परिणामी, दरमहा सरासरी २००० कोटी रुपयांचे कर्ज जड व हलकी वाणिज्य वाहने, ट्रॅक्टर्स तसेच प्रवासी वाहनांना कर्जवितरण करणाऱ्या कंपनीला उर्वरित तिमाहीत गुंतवणूकयोग्य गंगाजळीत साधारण १५ टक्क्यांचा वृद्धिदर अपेक्षिता येईल.
सामान्य गुंतवणूकदारांसाठी या रोखेविक्रीचा ८० टक्के हिस्सा राखीव ठेवण्यात आला असून, किमान १० रोख्यांसाठी म्हणजे १० हजार रुपयांची गुंतवणूक त्यांना यात करता येईल. तीन वर्षे, पाच वर्षे आणि सात वर्षे अशा मुदतीत या रोख्यांमधून अनुक्रमे ११.२५%, ११.५% आणि ११.७५% असा व्याजपरतावा मिळविता येईल.
क्रिसिल आणि केअर या पतमानांकन संस्थांनी या रोखेविक्रीला ‘क्रिसिल एए/स्थिर’ आणि ‘केअर एए’ असे मानांकन दिले आहे.