मौल्यवान धातूच्या दरातील अल्पावधीतील वेगवान फु गवटा आता नाहीसा झाला असून सोने तसेच चांदीच्या आकर्षित कि मतीही फिक्या पडू लागल्या आहेत. अवघ्या दोन सत्रांतील दुहेरी अंकांतील टक्के वारीतील सोने-चांदीतील घसरणीने लोकसत्ताच्या मंचावर व्यक्त झालेला भविष्यवेधही खरा ठरत आहे.

सोने तसेच चांदीच्या दराने गेल्या काही सलगच्या दरवाढीने विक्रमी टप्पा गाठला होता. तोळ्याला ५६ हजार रुपयांपुढे वाटचाल करणारे सोने तसेच चांदी किलोसाठी ७८ हजार रुपयांपर्यंत पोहोचली होती. सोने १० ग्रॅमसाठी ५० हजार रुपयांवर गेल्यापासून गुंतवणूकदार, खरेदीदारांचाही मौल्यवान धातूकडील ओघ आपसूकच वाढू लागला.

गेल्या महिन्याभरात सोने दर थेट ४० टक्क्यांनी वाढले. दर यापुढे गेले तर आपली संधी जाईल या धास्तीने, टाळेबंदीसारख्या कालावधीत सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणूनही अनेकांनी खरेदी सपाटा लावला. याच जोरावर अनेक तज्ज्ञांनी सोन्याचे नजीकच्या कालावधीतील अंदाजआकडे ६५ हजार ते अगदी ८० हजार रुपयांपर्यत नेऊन ठेवले.

विशेष म्हणजे फेब्रुवारी, मार्च महिन्यात गुंतवणूकदारांना लोकसत्ताच्या अर्थब्रह्म या गुंतवणूक मार्गदर्शनपर कार्यक्रमांद्वारे सोने-चांदीमध्ये गुंतवणूक करून जोखीम व्यवस्थापन मजबूत करण्याचा सल्ला दिला होता. त्याप्रमाणे अपेक्षेपेक्षा खूपच मोठा परतावा गुंतवणूकदारांना मिळाला आहे.

परंतु गेल्या काही दिवसांमध्ये ज्या वेगाने सोने-चांदीच्या भावात वाढ झाली त्यामुळे गुंतवणूकदारांना वेळीच सावध करणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत तज्ज्ञांनी लोकसत्ताकडे व्यक्त केले.

‘लोकसत्ता’च्या २७ जुलैच्या अर्थ वृत्तान्तमध्ये याविषयी आलेल्या लेखात गुंतवणूकदारांना सावध करतानाच वेळीच वायदे बाजारात खाते काढण्याचा सल्ला वायदे बाजार विश्लेषक व स्तंभलेखक श्रीकांत कुवळेकर यांनी दिला होता.

सोन्याच्या वायद्यामध्ये दोन दिवसांत  ५६,००० रुपये  ते ५०,००० रुपये अशी ११% पडझड झाली असताना हाजीर बाजारात तोच भाव ५५,५०० ते ५२,४०० रुपये म्हणजे ६ टक्क्यांहूनही पडला आहे. यापैकी मोठी पडझड भारतीय बाजार बंद असताना झाल्यामुळे त्याचाही फायदा फक्त वायदे बाजारातील खातेधारकांनाच घेता आला, असे मानले जाते.

बुधवारी सोने वायदे बाजार व्यवहारात ५०,००० रुपयांच्यादेखील खाली घसरून आता परत ५१,०००- ५१,५०० रुपयांपर्यंत सुधारले आहे. तर चांदीनेदेखील ७८,००० रुपयांच्या विक्रमी पातळीवरून आठवडय़ाभरात बुधवारी ६१,००० रुपयांच्या खाली घसरून आता ६५,००० रुपयांच्या दरम्यान स्थान राखले आहे.

गेल्या दोनच दिवसांत सोने १० टक्के   तर चांदीच्या कि मती २० टक्क्याने कोसळल्या आहेत. बाजारात चढ-उतार होत राहतील आणि सध्याची जागतिक अर्थव्यवस्थेची परिस्थिती पाहाता सोने दरात १० ग्रॅमसाठी ४८,२०० रुपयांपर्यंत घसरण काही दिवसांत शक्य असल्याचे सांगितले जाते. चीन व अमेरिकेमधील तणाव प्रमाणाबाहेर वाढल्यासच ५३,५०० रुपयांच्या पातळीवर भाव टिकणे शक्य आहे, असेही म्हटले जाते.

मुंबई सराफा बाजारात बुधवारअखेर नोंदभाव :

सोने : रु. ५२,४१५ (-१,३२०) (१०ग्रॅम)

चांदी : रु. ६५,७५० (-५,४६०) (१किलो)