आर्थिक वर्षांतील शेवटच्या तिमाहीतील अग्रिम कराचा हप्ता भरण्याची अंतिम तिथी मंगळवारी उलटली आणि देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या बाबतीत हे प्रमाण गेल्या वर्षांच्या तुलनेत ६० टक्क्यांनी घटल्याचे आढळून आले. स्टेट बँकेने अग्रिम कराचा शेवटचा हप्ता म्हणून यंदा ६८७ कोटी रुपये जमा केले, गतवर्षी हेच प्रमाण १,७४९ कोटी रुपये असे होते. बुडीत कर्जाच्या समस्येने त्रस्त सार्वजनिक क्षेत्रातील बहुतांश बँकांबाबत हीच स्थिती आहे.

स्टेट बँक आणि देशातील सर्वाधिक नफा कमावणारी खासगी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज यांचा अग्रिम कराचा भरणा करण्यात कायम अव्वल स्थान राहिले आहे. यंदा मात्र स्टेट बँकेच्या करभरणा रकमेतील घट खूपच विलक्षण असल्याची कबुली प्राप्तिकर विभागातील सूत्रांनीही दिली.

उल्लेखनीय म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील बहुतांश बँकांना अनुत्पादित मालमत्तेपोटी (एनपीए) कराव्या लागलेल्या भरीव तरतुदीने नफ्याचा हिस्सा गिळंकृत केला तर अनेकांनी सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत मोठा तोटा नोंदविला. हीच स्थिती जानेवारी ते मार्च या शेवटच्या तिमाहीतही कायम राहणार असल्याने अनेक बँकांचा अग्रिम कराचा हप्ता कमालीचा घटला आहे, अशी माहिती प्राप्तिकर विभागातील सूत्रांनी दिली.

बँकांव्यतिरिक्त, पोलाद तसेच बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांचीही अग्रिम कराचे प्रमाण यंदा घटले आहे. त्या उलट खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीतील घसरणीने फायद्यात असलेल्या तेल वितरण कंपन्या तसेच औषधी कंपन्यांकडून यंदा वाढीव अग्रिम कराचा भरणा झाल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

रिलायन्स इंडस्ट्रीजने या बाबतीत आपले अव्वल स्थान कायम राखताना यंदाच्या तिमाहीत २,२१५ कोटी रुपयांचा अग्रिम कर भरला. गतवर्षी याच तिमाहीतील १,५९४ कोटी रुपयांच्या अग्रिम कराच्या तुलनेत यंदा ३८ टक्क्यांची वाढ कंपनीने दाखविली आहे. साहजिकच चालू तिमाहीत कंपनीला नफ्यातही याच प्रमाणात वाढ अपेक्षित आहे.