News Flash

आगामी वित्तवर्षांपासून सुधाराचे संकेत

चालू वर्षांसाठी तीन पतमानांकन संस्थांचा उणे दोन अंकी विकासदराचा अंदाज

(संग्रहित छायाचित्र)

पहिल्या तिमाहीतच दुहेरी आकडय़ातील उणे अर्थ विकासदर नोंदविणाऱ्या भारताची संपूर्ण आर्थिक वर्षांची वाटचालही याच खडतर मार्गावरून कायम राहणार आहे. तीन आघाडीच्या पतमानांकन संस्थांनी विकासदर २०२०-२१ मध्ये उणे १५ टक्क्यांपर्यंत आक्रसणे अंदाजले आहे.

एप्रिल ते जून २०२० या चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीचा वाढीचा नकारात्मक म्हणजे उणे २३.९ टक्के  नोंदला गेला आहे. अमेरिकी गोल्डमन सॅक्स, इंडिया रेटिंग्ज व फिच रेटिंग्ज या आघाडीच्या तीन पतमानांकन संस्थांनी मंगळवारी भारताच्या अर्थव्यवस्थेचा आगामी कल जाहीर केला. यानुसार देशावरील अर्थसंकट मार्च २०२१ पर्यंत कायम राहण्याचे संकेत देण्यात आले आहेत. उणे स्थितीतील सध्याच्या विकास दरापेक्षा वित्त वर्षअखेर अर्थव्यवस्थेत सुधार येणार असल्याचे संस्थांनी म्हटले असले तरी त्यांच्या यापूर्वीच्या अंदाजापेक्षा ती स्थिती अधिक बिकट असेल, असे सुचविण्यात आले आहे.

गोल्डमॅन सॅक्स : -१४.८ टक्के

या अमेरिकी दलाली पेढीने यापूर्वीच्या उणे ११.८ टक्के  अंदाजात सुधार करून, देशाचा विकास दर उणे १४.८ टक्क्य़ांनी आंकुचन पावेल, असे स्पष्ट केले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत अंदाज वर्तविताना, टाळेबंदीच्या निरंतरतेचा गोल्डमन सॅक्सने आपल्या अहवालात प्रामुख्याने उल्लेख केला आहे. मात्र कोविड-१९ बाधितांची सर्वाधिक संख्या असलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या देशात टाळेबंदी शिथिल झाली असली तरी साथीवर नियंत्रण येऊ शकलेले नाही, असे तिचे  निरीक्षण आहे.

इंडिया रेटिंग्ज  : -११.८ टक्के

स्थानिक पतमानांकन संस्थेने भारताच्या विकास दराबाबतचा यापूर्वीचा अंदाज उणे ५.३ टक्क्यांवरून उणे ११.८ टक्के  केला आहे. मात्र आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये देश सकारात्मक अर्थवेग नोंदवेल, असे स्पष्ट करत हा आकडा ९.९ टक्के  असेल, अशी शक्यता इंडिया रेटिंग्जने वर्तविली आहे.

फिच रेटिंग्ज : -१०.५ टक्के

फिच रेटिंग्जनेही यापूर्वीचा भारतीय अर्थव्यवस्था वाढीचा उणे ५ टक्के  अंदाजलेला दर आता उणे १०.५ टक्क्य़ांवर नेला आहे. पतमानांकन संस्थेनेही देशाच्या सुमार अर्थप्रवासाला करोना आणि टाळेबंदी हे कारण ठरणार असल्याचे नमूद केले आहे. फिच रेटिंग्जने जागतिक अर्थव्यवस्थेचा वेग उणे ४.४ टक्के  तर भारताचा स्पर्धक चीनचा विकास दर मात्र सकारात्मक २.७ टक्के  अपेक्षिला आहे. अमेरिका, ब्रिटन, भारतासह जगभरातील प्रमुख अर्थव्यवस्था उणे स्थितीत असताना चीनने नुकतीच ३ टक्के तिमाही वाढ नोंदविली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 12:24 am

Web Title: signs of improvement from the coming financial years abn 97
Next Stories
1 कामत समितीकडून स्थावर मालमत्ता क्षेत्राला अग्रक्रम
2 व्होडाफोन आयडिया आता व्हीआय
3 अर्थव्यवस्थेची अधोगती चिंताजनक – राजन
Just Now!
X