सिंगापूरच्या सिंगटेलचा हिस्सा ५० टक्क्य़ांवर

नवी दिल्ली : मोबाइल ग्राहकसंख्येतील घसरणीचा सामना करावा लागत असलेल्या भारती टेलिकॉमला विदेशी दूरसंचार कंपनीने हातभार लावला आहे. सिंगापूरस्थित सिंगटेलने भारती टेलिकॉमधील निम्मा, ५० टक्के हिस्सा खरेदी केला आहे.

कंपनीला रिलायन्स जिओबरोबरच व्होडाफोन आयडियाचीही तीव्र स्पर्धा आहे. परिणामी दोन्ही कंपन्यांनी भारती एअरटेलचे ग्राहकसंख्येबाबतचे क्रमांक एकचे पद हिसकावून घेतले आहे.

एअरटेलची मुख्य प्रवर्तक भारती टेलिकॉमचा भारतीय दूरसंचार कंपनीत ४१ टक्के हिस्सा आहे. तर प्रवर्तक सुनील भारती मित्तल व त्यांच्या कुटुंबीयांचा कंपनीत ५२ टक्के हिस्सा आहे.

सिंगापूरच्या सिंगटेल टेलिकॉमच्या गुंतवणुकीमुळे कंपनीवरील कर्ज कमी होण्यास साहाय्य होईल, असा विश्वास भारती टेलिकॉमने व्यक्त केला आहे. कंपनीने १०० टक्के थेट विदेशी गुंतवणूक परवानगीसाठी सरकारकडे अर्ज केला आहे. यापूर्वी कंपनीची याबाबतची परवानगी सरकारने नाकारली आहे.

सिंगटेल सध्या भारती एअरटेलमध्ये ३५ टक्के हिस्सा राखून आहे. एअरटेलवर १.१६ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. पहिल्यांदा व्होडाफोनच्या विलीनीकरणाच्या माध्यमातून आयडिया सेल्युलरने एअरटेलचे अग्रणी स्थान काबीज केले. तर तत्पूर्वी रिलायन्स जिओच्या स्पर्धेने अव्वल स्थान डळमळीत झाले. भारती एअरटेल आता ग्राहकसंख्येबाबत देशात तिसऱ्या स्थानावर आहे.