म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांना ‘एसआयपी’ ही गुंतवणुकीची पद्धतशीर योजना चांगलीच अंगवळणी पडली असल्याचे, यातील गुंतवणुकीचा वाढता ओघ दाखवून देतो. उपलब्ध माहितीनुसार, देशातील सर्व फंड घराण्यांकडील एकूण ‘एसआयपी’ मालमत्तेने प्रथमच ४ लाख कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे.

भारतातील म्युच्युअल फंड उद्योगाची शिखर संघटना असलेल्या ‘अ‍ॅम्फी’च्या फेब्रुवारीमधील आकडेवारीनुसार, गुंतवणूकदारांची पद्धतशीर व शिस्तबद्ध गुंतवणुकीच्या ‘एसआयपी’ योजनांना पसंती राहिल्याचे स्पष्ट  होते.  जानेवारीतील एसआयपी खात्यांची संख्या ३.५५ कोटींवरून फेब्रुवारीमध्ये ३.६२ कोटींवर  पोहोचली आहे. लिक्विड आणि ओव्हर नाइट फंड प्रकार वगळता अन्य सर्वच फंड वर्गवारींमध्ये एसआयपीचा ओघ वाढल्याचे दिसून आले आहे.

जानेवारी २०२१ मधील ३.९० लाख कोटींवरून फेब्रुवारी २०२१ अखेरीस एसआयपी मालमत्ता ४.१० लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. जानेवारीत म्युच्युअल फंडांच्या एसआयपी मालमत्तेत ३१,१२८ कोटी रुपयांची वाढ झाली होती. तर फेब्रुवारीत ७,५२८ कोटी रुपये  ‘एसआयपी’च्या माध्यमातून गुंतविण्यात आले. मालमत्तेतील वाढ ही मुख्यत्वे समभागांच्या किमतीतील वाढ आणि गुंतवणूकदारांचा एसआयपीला वाढता प्रतिसादामुळे आहे. फेब्रुवारीअखेरीस एसआयपी मालमत्तेचा वृद्धीदर ७.९७ टक्के नोंदला गेला आहे.

गुंतवणुकीतील सुलभता व शिस्त, समभाग गुंतवणुकीचे फायदे ‘रुपी कॉस्ट अ‍ॅव्हरेजिंग’, चक्रवाढ वृद्धी या ‘एसआयपी’मुळे शक्य होणाऱ्या फायद्यांचे महत्त्व अधिकाधिक गुंतवणूकदारांना पटू लागले आहे. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे गुंतवणूकदारांचे भौगोलिक अंतर कमी झाल्याचा परिणाम ‘एसआयपी’च्या मालमत्तेत वृद्धी होण्यात झाला आहे.

– अजित मेनन, मुख्य कार्यकारी अधिकारी पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंड