करोना विषाणूजन्य साथीच्या संक्रमणाच्या भीतीमुळे बाजारात निर्माण झालेल्या अस्थिरतेचा परिणाम नियोजनबद्ध अर्थात ‘एसआयपी’ गुंतवणूकदारांमध्येही दिसून आला आहे. प्रत्येक तीन एसआयपी संबंधित व्यवहारामधील दोन म्हणजे जवळपास ७० टक्के एसआयपी सरलेल्या मार्च महिन्यांत बंद झाल्याचे सूचित करणारा गंभीर परिणाम दिसून येत आहे.

मार्च महिन्यांत मुदतपूर्व बंद झालेल्या ‘एसआयपी’च्या संख्येने लाखाचा टप्पा गाठला आहे. सरलेल्या आर्थिक वर्षांत महिनागणिक एसआयपी गुंतवणुकीत वाढीच्या प्रघाताच्या नेमके उलट हे चित्र आहे. सरलेल्या आर्थिक वर्षांच्या पहिल्या अकरा महिन्यांत सुरू झालेल्या एसआयपीचे बंद झालेल्या एसआयपीशी सरासरी गुणोत्तर ५७.४० टक्के होते हे प्रमाण मार्च महिन्यांत वाढून ७० टक्क्यांवर पोहोचले आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार मागील महिन्यात नव्याने एसआयपी नोंद होण्याचे प्रमाण २५ टक्क्य़ांनी घटले आहे. फेब्रुवारीतील ११ लाख एसआयपींच्या तुलनेत मार्च महिन्यांत ८.४९ लाख नव्या एसआयपींची नोंद झाली. बाजारातील अस्थिरता आणि आक्रसलेल्या रोकड सुलभतेचा हा परिणाम आहे. गुंतवणूकदारांनी मागील पाच ते सात वर्षे केलेल्या एसआयपीवरही तोटा झाल्याने गुंतवणूकदार मानसिकदृष्टय़ा एसआयपी सुरू ठेवण्यास तयार नसल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

भविष्यातील पैशांची आवक किती असेल याबद्दल गुंतवणूकदारांना खात्री नाही. महामंदीमुळे अनेक व्यवसायातील कर्मचाऱ्यांना मोठय़ा वेतन कपातीस तोंड द्यावे लागत आहे, तर अनेक क्षेत्रात नोकऱ्याही संकटात आहेत. साहजिकच खर्च कमी करण्यासाठी एसआयपी बंद करण्याचा उपाय योजला जात आहे.