हर्षद कशाळकर

पेण अर्बन बँक घोटाळ्याला दहा वर्षे पूर्ण होत आली आहेत. मात्र या प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती आणि कायदेशीर गुंतागूंत यामुळे घोटाळ्याचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यामुळे ठेवीदारांचे मात्र हाल कायम आहेत. आज ना उद्या हक्काचे पैसे मिळतील या अपेक्षेत ४५० हून अधिक ठेवीदारांनी आतापर्यंत जीव गमावला आहे.

बँकेच्या संचालक मंडळाने ११९ जणांना कागदपत्राची पूर्तता न करताच ७३४ कोटी रुपयांचे बोगस कर्ज वितरण केले. त्यामुळे ७५ वर्षांंची परंपरा असणारी ही बँक अडचणीत सापडली.  बँकेचे एकूण १ लाख ९३ हजार ६४१ खातेदार आहेत. या खातेदारांच्या बँकेच्या १८ शाखांमध्ये ६३२ कोटी ५० लाख रुपयांच्या ठेवी आहेत. प्रामुख्याने शेतकरी, शिक्षक, कर्मचारी, आदिवासी, शिक्षण संस्था, पतसंस्था, नगरपरिषदा यांचा पैसे यात अडकले आहेत.

२३ सप्टेंबर २०१० ला पेण अर्बन बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर रिझव्‍‌र्ह बँकेने निर्बंध घातले. सातत्याने लेखापरीक्षण अहवालात अ वर्ग मिळवणारी ही बँक अचानक अडचणीत आली. ७०० कोटी रुपयांचा घोटाळा समोर आला आणि पावणेदोन लाख ठेवीदारांच्या पायाखालची जमीनच सरकली. ठेवीदारांच्या ठेवींचा आणि बँक घोटाळ्याचा तिढा अद्याप काही सुटलेला नाही. लाखो रुपयांच्या ठेवी अडकलेले ठेवीदार तर हलाखीचे जीवन जगत आहेत. आज ना उद्या े पैसे परत मिळतील या आशेवर आला दिवस ढकलत आहेत. उसनवारीकरून गरज भागवत आहेत.

न्यायालयीन लढाईबरोबरच या प्रकरणाचा ठेवीदारांकडून शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. ठेवीदारांच्या माध्यमातून यासंदर्भात अनेक आंदोलनेही आजवर करण्यात आली आहे. पण कोरडय़ा आश्वासनापलीकडे त्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. बँकेच्या थकीत कर्जांची वसुली होताना दिसत नाही. जप्त केलेल्या मालमत्तांच्या विक्रीलाही गती नाही. बुडालेल्या पैशातून पनवेल ,पेण, पाली, रोहा तसेच राजस्थानमध्ये ज्या जमिनी विकत घेण्यात आल्या त्या विकून ठेवीदारांचे पैसे सहज परत करता येवू शकतात. परंतु ही प्रक्रिया अतिशय संथ गतीने सुरू आहे.

बँक घोटाळ्याची चौकशी विविध पातळी सुरू आहे. यात स्थानिक पोलीस, सहकार विभाग, सक्तवसुली संचलनालय, केंद्रीय अन्वेषण विभाग, रिझव्‍‌र्ह बँक यंत्रणांचा समावेश आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार  राज्याच्या सहकार सचिवांनी विशेष कृती समितीची स्थापना केली आहे. पण या समितीच्या नियमीत बैठका होत नसल्याच्या तक्रारी आहेत.

आजपर्यंत ६६ कोटी ४० लाख रुपये विविध माध्यमातून ठेवीदारांना परत केले आहेत. मात्र अजूनही ६१४ कोटींच्या ठेवी परत करायच्या आहेत. आता ५५ कोटी रुपये शिल्लक आहेत . त्यातून २५ हजारांच्यावर ठेवी असलेल्या ठेवीदारांना काही रक्कम परत करण्यास परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत, पण अद्याप परवानगी मिळालेली नाही.

दहा वर्षे झाली तरी नुसती आश्वासने देऊन आमच्या तोंडाला पाने पुसली. माजी मुख्यंमंत्र्यांनी, सिडकोला जागा विकत घेऊन पैसे द्यायला सांगतो. ठेवीदांराना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी अनेक आश्वासने  दिली. पण ठेवीदारांचे पैसे काही मिळाले नाही. ४५० ठेवीदार हाल होऊन मरण पावले. अजून किती लोकांच्या मरणाची वाट पाहणार आहे. सरकारने हा प्रश्न सोडवावा व ठेवीदारांचे पैसे मिळवून द्यावेत.

– यशवंत चव्हाण, ठेवीदार.

सक्तवसुली संचलनालयाने जमिनींच्या विक्रीवर स्थगिती मिळविली आहे. ही स्थगिती उठवावी यासाठी ठेवीदारांचे प्रयत्न सुरू आहेत. पण त्यात अजून यश आलेले नाही.  शासकीय यंत्रणांकडून बँक अवसायानात काढण्याचे काढण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र त्यास ठेवीदारांचा विरोध आहे. थकीत कर्जांच्या वसूलीकडे दुर्लक्ष होत आहे. पाच वर्षांत साडे चार कोटींची वसुलीच होऊ शकली आहे.

– नरेन जाधव, कार्याध्यक्ष.