17 December 2017

News Flash

टाटा समूहाचे सहावे रत्न; कुटुंबाबाहेरचे दुसरे अध्यक्ष

टाटा समूहाचे सहावे अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारणारे मिस्त्री हे टाटा कुटुंबाबाहेरील असलेले दुसरे अध्यक्ष

मुंबई | Updated: December 29, 2012 12:17 PM

टाटा समूहाचे सहावे अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारणारे मिस्त्री हे टाटा कुटुंबाबाहेरील असलेले दुसरे अध्यक्ष ठरले आहेत. टाटा समूहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांच्या अध्यक्षपदानंतर त्यांचे पुत्र सर दारब आणि नातू जेआरडी तसेच खापर नातू रतन टाटा या कुटुंबातील सदस्यांनी समूहाची धुरा अध्यक्ष म्हणून वाहिली आहे. मात्र सर नौरोजी साकलातवाला यांच्यानंतर अध्यक्षपद सांभाळणारे सायरस मिस्त्री हे टाटा कुटुंबाबाहेरचे दुसरे अध्यक्ष ठरणार आहेत. जमशेटजींचा पहिला खरा वारसदार म्हणून मान प्राप्त करणारे जेआरडी टाटा यांनी १९३८ ते १९९१ पर्यंत अध्यक्षपदाची यशस्वी धुरा वाहिली. तर रतन टाटा यांनी त्यानंतर सलग २१ वर्षे हे अध्यक्षपद सार्थपणे सांभाळले. रतन टाटा यांनी वयाच्या ५४ व्या वर्षी टाटा समूहाच्या अध्यक्षपदाची सूत्रे जेआरडींकडून स्वीकारली होती. सायरस मिस्त्री यांच्याकडे ४४ व्या वर्षी हे पद आले आहे.
पुढय़ात आव्हाने; प्रतिमेचाही भार
अत्यंत बिकट स्थितीत रतन टाटा यांना नव्या वारसदाराकडे सूत्रे देण्याची वेळ आली असताना स्वत: सायरस मिस्त्री यांच्या पुढय़ात आव्हानांची जंत्री कायम आहे. शिवाय रतन टाटा यांची प्रतिमा जपण्याची कसरतही त्यांना करावी लागणार आहे. रतन टाटा यांच्यापुढे समूहापेक्षा मोठे होणाऱ्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांना बाजूला सारण्याचे अवघड कार्य करावे लागले; तर सायरस मिस्त्री यांना समूहात त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ असणाऱ्यांबरोबर समूहाचा गाडा हाकण्याची मोहिम पार पाडावी लागणार आहे. व्यक्तीपेक्षा उपकंपन्यांना अधिक विस्तारण्याकडे त्यांना कल ठेवावा लागेल. याचबरोबर राजकारण, उद्योग, प्रशासन या पातळ्यांवर रतन टाटा यांनी निभावलेल्या भूमिकेशी सामंजस्य वातावरण त्यांना आचरणात आणावे लागेल. टाटा यांच्यासारखा मितभाषी गुण मिस्त्री यांच्याकडे असला तरी बिकड प्रसंगातील सावध निर्णयक्षमतेचा त्यांचा गुण यापुढे पाहण्याची अपेक्षा निर्माण होऊ लागली आहे.
मोठा विचार करा, अशी शिकवण रतन टाटा यांनी समूहातील प्रत्येकाला नेहमीच दिली. त्यांनी सूत्रे हाती घेतली तेव्हा मला नाही वाटत समूह १० अब्ज डॉलरचाही असेल की नाही. पण आज त्याचा आकार १०० अब्ज डॉलर इतका झाला आहे. यातच सारे आले. तेथे संधी होती आणि त्यांनी ती घेतली.
– जे. जे. इराणी, माजी संचालक, टाटा सन्स.

रतन टाटा यांनी टाटा समूहाला हुशारीने नेतृत्व दिले आणि त्याचे यशस्वीरित्या विस्तार व खऱ्या अर्थाने जागतिकीकरण केले.
– अदि गोदरेज, अध्यक्ष, गोदरेज समूह.

रतन टाटा यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेल्या धैर्यशील व्यवसाय आणि जपलेल्या नैतिकतेच्या मार्गाला तमाम उद्योग क्षेत्राचा मानाचा सलाम आहे. नवे नेतृत्वही त्यांचा हा बाणा नक्कीच जपेल.
– राजकुमार धूत, अध्यक्ष, असोचेम.

जेआरडींनी सोपविलेली जबाबदारी रतनने मोठय़ा कुशलतेने पार पाडली. त्याने घेतलेले निर्णय अनेकांना आश्चर्यचकित करणारे ठरले. पण आज हा उद्योग समूह उगीचच १०० अब्ज डॉलरच्या घरात गेला नाही. माझ्या माहितीप्रमाणे समूहाचा ६० टक्क्यांहून अधिक महसूल भारताबाहेरून येतो. हे लक्षात घेता सायरसलाही मोठे काम करावे लागेल, अशी अपेक्षा आहे.
– राहुल बजाज, अध्यक्ष, बजाज ऑटो.

टाटा समूहातील अनेक ब्रॅण्ड रतन टाटा यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित झाले. काही कंपन्यांचे पुर्ननामकरण यासह अनेक उत्पादनांना त्यांनी नवा चेहरा दिला.
– संतोष देसाई, ब्रॅण्ड प्रमुख, फ्युचर ग्रुप.

रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली २०१२ मध्ये टाटा समूहातील कंपन्यांनी २५% झेप घेतली आहे. यामध्ये अर्थातच सर्वाधिक उडी टाटा कॉफीने घेतली आहे. या वर्षभरात कंपनीचा समभाग ८४.४ टक्क्यांनी वधारला; तर या दरम्यान सुमार कामगिरी रेलिज इंडियाने, २६.६ टक्क्यांसह बजाविली आहे.

‘निफ्टी’वरील २०१२ मधील वाढीची कामगिरी
टाटा कॉफी    ८४.४%
टाटा ग्लोबल    ७७.६%
टाटा मोटर्स    ७४.१%
टायटन     ६५.२%
ट्रेन्ट        ४९.३%
व्होल्टास    ४१.४%
टाटा एलक्सी    ३१.२%
टाटा स्टील    २९.४%
टाटा स्पॉन्ज    २८.९%
रेलिज        २६.६%
‘सेन्सेक्स’च्या दरबारी २०१२ मध्ये टाटा मोटर्स सर्वाधिक चांगली कामगिरी बजाविणारा समभाग ठरला आहे. याबाबत त्याने अक्षरश: मक्तेदारी असलेल्या इन्फोसिसलाही मागे टाकले आहे. टाटा मोटर्स भारतात बिकट प्रवास करत असला तरी ‘जग्वार अ‍ॅण्ड लॅण्ड रोव्हर’मुळे त्याला बळकटी मिळत आहे.

‘मुंबई बाजारा’तील शुक्रवारची तेज कामगिरी

टाटा मोटर्स        ०.०५%
टीसीएस        १.२१%
टाटा पॉवर        ०.४१%
टाटा केमिकल्स    २.६९%
व्होल्टास        १.४०%
नेल्को             १.९९%
टाटा मेटलिक्स        १.६४%
इंडियन हॉटेल्स    १.७८%
टाटा कॉपी        ०.२९%
टाटा कम्युनिकेशन्स    ६.१२%

१९९१    ७,९४३ कोटी रुपयांचे बाजारमूल्य
२०१२    ४,६२,००० कोटी रुपयांहून अधिक बाजारमूल्य

२०.८%    टाटा कंपन्यांचा १९९१ ते २०१३ चा परतावा
१३.५%    सेन्सेक्स, निफ्टीचा दोन दशकातील परतावा

२००१    टाटा समूहाची ३०% वाढ
२०१२    दशकात दोन्ही भांडवली बाजाराची वाढ १५% पुढे

२२%    टीसीएसला वगळले तर टाटा समूहाला मिळणारा प्रतिसाद
१५.६%    माहिती-तंत्रज्ञान कंपनीच्या समभागाचा व्यवहार नसेल तर ‘सेन्सेक्स’ची वाढ
http://www.tata.in टाटा समूहाचे संकेतस्थळ. या व्यासपीठावर २८ डिसेंबरअखेपर्यंतही रतन टाटाच अध्यक्ष.

निवृत्तीचा दिवस रतन टाटा यांनी पुण्यात घालविला. संघटनेच्या आग्रहाखातर आपण कंपनीच्या वाहन निर्मिती प्रकल्पात जाणे पसंत केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ट्विटरवर रतन टाटा यांनी आपल्याला यावेळी मिळत असलेल्या शुभेच्छांबद्दल हितचिंतकांचे आभार मानले. हा दिवस मी आयुष्याच्या शेवटपर्यंत लक्षात ठेवेल, असेही ते म्हणाले.

निवृत्तीचा शेवटचा दिवस माझ्या सहकार्यांमध्ये व्यतीत करून मला खूप आनंद झाला आहे. अनेकांनी माझ्या वाढदिवसासह आगामी भविष्यासाठी चिंतलेल्या शुभेच्छांबद्दल मी आत्यंतिक आभारी आहे.
– रतन नवल टाटा,
‘टाटा समूहा’चे अध्यक्ष या नात्याने आपल्या शेवटच्या दिवसाबद्दल.

First Published on December 29, 2012 12:17 pm

Web Title: sixth diamond tata group second president out of family