सण-समारंभाच्या कालावधीत भाज्यांच्या किमती निम्म्याने, तर कांद्याच्या दरांनी शंभरी गाठल्याचा परिणाम म्हणून ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाईचा दर दुहेरी आकडय़ात पोहोचला आहे. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई गेल्या महिन्यात १०.०९ टक्क्यांवर गेली आहे.
‘सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालया’ने मंगळवारी सायंकाळी उशिरा जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये भाज्यांच्या किमती सर्वाधिक ४५.७६ टक्क्यांनी वधारल्या आहेत. याच कालावधीत राजधानी दिल्लीपासून देशात सर्वत्र कांद्याचे दर किलोला १०० रुपयांपर्यंत पोहोचले होते.
सप्टेंबर २०१३ मध्ये किरकोळ महागाई दर १० टक्क्यांच्या काठावर होताच. या वेळी त्याची ९.८४ टक्के नोंद झाली होती. पुढील ऑक्टोबर महिन्यात हा टप्पा पार करत महागाई दराने १०.०९ टक्क्यांपर्यंत मजल मारली.
मोठय़ा प्रमाणात दरवाढ झालेल्या जिनसांमध्ये अंडी, मासे, मटण, मसाले, फळे, तयार खाद्य पदार्थ, कपडे, पादत्राणे यांचा समावेश राहिला आहे. तर डाळी, तेल यांचे दर स्थिर राहिले आहेत व साखरेच्या किमती मात्र ५.४६ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. दूध आदी पदार्थामध्येही वाढ नोंदली गेली आहे.