पावसाच्या अपेक्षेत असलेल्या मुंबईकरांना ढगाळ वातावरणाची चाहूल अपेक्षित असताना समभागांच्या जोरदार सरींसह दलाल स्ट्रीटवर शुक्रवारी निर्देशांकाच्या मोठय़ा घसरणीचे ढग जमा झाले. एकाच सत्रात तब्बल ४५५ अंशांची आपटी घेत सेन्सेक्सला गुंतवणूकदारांनी २० हजाराखाली आणून ठेवले. ढासळत्या आर्थिक विकासदाबाबत व्यक्त केलेली चिंतेपोटी गुंतवणूकदारांना सप्ताहअखेर एक लाख कोटी रुपयांची किंमतही मोजावी लागली.
सेन्सेक्स सप्ताहअखेर ४५५.१० अंश घसरणीसह १९,७६०.३० वर तर निफ्टी १३८.१० अंश घसरणीसह ५,९८५.९५ पर्यंत येऊन ठेपले. सेन्सेक्स व निफ्टीने अनुक्रमे २०,००० व ६,००० ही पातळी शुक्रवारच्या मोठय़ा घसरणीने सोडली.
रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बराव यांनी महागाईस चालू खात्यातील तुटीबद्दल व्यक्त केलेल्या भीतीनंतर भांडवली बाजारात देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाबद्दल गंभीर वातावरण निर्माण केले गेले. व्याजदराशी निगडित समभागांसाह बांधकाम, बँक, तेल व वायू आदी सारेच क्षेत्रीय निर्देशांक शुक्रवारी आपटले होते. तर सेन्सेक्समधील सारेच घसरणीला लागले. रिलायन्स, स्टेट बँक अशा आघाडीच्या समभागांचा वाटा सेन्सेक्समध्ये ४०० अंश घसरणीपर्यंतचा होता. प्रमुख भांडवली बाजाराने गेल्या १५ महिन्यातील सर्वात मोठी निर्देशांक आपटी अनुभवली.

एक लाख कोटी रुपयांना ओहोटी
निर्देशांकाला २० हजाराखाली खेचणाऱ्या मुंबईच्या भांडवली बाजारात गुंतवणूकदारांचा खिसाही चांगलाच हलका झाला. ४५० अंशांची घसरण नोंदविणाऱ्या बाजारात गुंतवणूकदारांची मालमत्ता एकाच दिवसात एक लाख कोटी रुपयांनी कमी झाली. गुंतवणूकदारांचे बाजारमूल्य एक लाख कोटी रुपयांनी कमी होत ते शुक्रवारी बाजारातील व्यवहारांती ६६,७८,७३६.६४ कोटी रुपयांवर येऊन ठेपले. घसरत्या सकल राष्ट्रीय उत्पादन दरामुळे बाजारात गुंतवणूकदारांनी मोठय़ा प्रमाणात समभागांची विक्री करण्याचे धोरण सप्ताहअखेर अवलंबिले.

रुपयाची लोळण ५७ च्या दिशेने
डॉलरच्या तुलनेत अवमूल्यन होणारे भारतीय चलनाची मजल आता ५७ च्या आकडय़ाकडे सुरू झाली आहे. ५६ च्या तळात गेलेला रुपया शुक्रवारी १२ पैशांनी घरंगळत ५६.५० पर्यंत येऊन ठेपला. स्थानिक चलनाची ही गेल्या ११ महिन्यातील खोली होती. यापूर्वी रुपयाने २८ जून २०१२ रोजी ५६.७६ हा स्तर अनुभवला आहे. परकी चलन व्यासपीठावर आयातदारांनी भारतातील घसरत्या सकल राष्ट्रीय उत्पादनाबद्दल तसेच वाढत्या चालू खात्यातील तुटीबद्दल चिंता व्यक्त करत डॉलरची मोठय़ा प्रमाणातील खरेदी अवलंबली. चलनाचा आठवडय़ातील आजचा शेवटचा दिवस होता. सप्ताहात तो ८७ पैशांनी कमकुवत बनला आहे

उर्वरित वर्षांत लक्षणीय भांडवली गुंतवणूक होईल असे दिसत नाही. सरकारने विदेशी गुंतवणुकीच्या शक्यतेतून काहीही भाकीत केले तरी आगामी काळात आर्थिक विकासदरात सुधारणा दृष्टीपथात नाही.
ए. एम. नाईक अध्यक्ष एल अ‍ॅण्ड टी