महागाई दराचा भडका, औद्योगिक उत्पादन दराचा टक्काही घसरला

किलोसाठी शंभरी पार करणाऱ्या कांद्याने गेल्या महिन्यात एकूणच  किरकोळ ्किमतीवर आधारीत महागाई निर्देशांकालाही भडका दिला आहे. बिगर मोसमी पावसाचा फटका बसलेल्या भाज्या तसेच अन्नधान्यामुळे ऐन दिवाळीच्या महिन्यातील महागाई निर्देशांकाने रिझव्‍‌र्ह बँकेसाठी सहनशील चार टक्क्यांच्या मर्यादेच्या खूपच पुढे मजल मारली आहे. हे कमी काय म्हणून गुरुवारी स्पष्ट झालेल्या शून्याखाली वेगाने गटांगळी खाणाऱ्या औद्योगिक उत्पादन दराच्या टक्क्य़ाने अर्थव्यवस्थेत तीव्र चिंता निर्माण केली आहे.

किरकोळ महागाई ५.५४ टक्के दर; तीन वर्षांची उच्चांकी झेप

  • महागडय़ा भाज्या तसेच अन्नधान्याच्या अन्य वस्तू यामुळे गेल्या महिन्यातील चलनवाढीचा दर थेट ५.५४ टक्क्यांवर झेपावला असून तो आता याआधीच्या तीन वर्षांतील सर्वोच्च टप्प्यावर पोहोचला आहे.
  • आधीच्या महिन्यात, ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाई निर्देशांक ४.६२ टक्के तर वर्षभरापूर्वी, नोव्हेंबर २०१८ मध्ये तो २.३३ टक्के नोंदला गेला. यापूर्वीचा सर्वोच्च महागाई निर्देशांक ६.०७ टक्के असा जुलै २०१६ मध्ये होता.
  • राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने गुरुवारी जाहीर केलेला महागाई निर्देशांकातील अन्नधान्याच्या गटातील दर दुहेरी अंकापर्यंत उंचावत १०.०१ टक्क्यांवर पोहोचला आहे. आधीच्या महिन्यात तो उणे २.६१ टक्के स्थितीत होता.

औद्योगिक उत्पादन दरात उणे ३.८ टक्क्य़ांनी घसरण

ऊर्जा, खाणकाम, निर्मिती क्षेत्रातील सुमार कामगिरीमुळे देशाचा औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने ऑक्टोबरमध्ये उणे ३.८ टक्के असा सलग तिसऱ्या महिन्यांत उतरता प्रवास केला आहे. वर्षभरापूवी, ऑक्टोबर २०१८ मध्ये औद्योगिक उत्पादन दर ८.४ टक्के होता. दसरा सण असलेल्या ऑक्टोबरमध्ये निर्मिती क्षेत्र २.१ टक्क्यांनी घसरले आहे. वर्षभरापूर्वी, याच कालावधीत ते ८.२ टक्के होते. तर ऊर्जा निर्मितीचा दर १२.२ टक्क्यांनी घसरला आहे. ऑक्टोबर २०१८ मध्येही दुहेरी अंकातच, १०.८ टक्के होता. कोळसा तसेच पोलाद निर्मिती दर दोन महिन्यांपूर्वी यंदाच्या ऑक्टोबरमध्ये ८ टक्के नोंदला गेला आहे. वार्षिक तुलनेत तो यंदा किरकोळ उंचावला आहे.