अर्थव्यवस्थेच्या प्रगती मंदावल्याचा दोषारोप नि:संदिग्धपणे आधीच्या सरकारचा धीम्या कारभारावर आणि नैसर्गिक संसाधनांच्या सदोष वाटपावर ठेवत, रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी केंद्रातील विद्यमान राजकीय स्थिरतेतून पुढील तीन वर्षांत सात टक्क्य़ांचा आर्थिक विकास दर गाठणे शक्य असल्याचा निर्वाळाही दिला.
वार्षिक ८-९ टक्के दराने अर्थव्यवस्थेची प्रगती सुरू असताना, गेल्या दोन वर्षांत ती ४-५ टक्क्य़ांवर रोडावणे यासाठी पर्यावरण आणि भूसंपदनासारख्या समस्या, जागतिक आर्थिक अरिष्टाच्या पाश्र्वभूमीवर राबविलेल्या वित्तीय आणि पत-प्रोत्साहक योजनांची दीर्घकाळ सुरू राहिलेली अंमलबजावणी, नैसर्गिक संसाधनाच्या वाटपातील गैरव्यवहार आणि मुख्य म्हणजे सरकारचा धीमा कारभार या गोष्टी जबाबदार असल्याचे राजन यांनी विधान केल्याचे ‘सिटी’ या वित्तसंस्थेच्या प्रसिद्धी निवेदनाने नमूद केले आहे. राजन यांनी गुरुवारी बोस्टन येथे गुंतवणूकदारांच्या समुदायासमोर हे भाषण केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या कोळसा खाणवाटपासंबंधातील आदेशावर प्रतिक्रिया देताना राजन यांनी ‘‘अल्प काळासाठी या आदेशाने अनिश्चितता जरूर निर्माण केली आहे, परंतु दीर्घ मुदतीत या त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील,’’ असे विधान केले.