चीनचा आर्थिक विकास दर तिसऱ्या तिमाहीत ६.९ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. २००९ पासून चीनची आर्थिक वाढ इतकी खाली येण्याची ही पहिलीच वेळ आहे. या घसरणीमुळे आता चीनला जगातील दुसऱ्या मोठय़ा अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी नवीन आर्थिक योजना जाहीर करावी लागणार आहे.
चीनची अर्थव्यवस्था या वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीत सात टक्क्यांच्या खाली घसरली असून, २००९ मधील आर्थिक पेचप्रसंगानंतर प्रथमच असे घडले आहे. चीनमधून होणारी निर्यात कमी झाली असून, त्याचा फटका अर्थव्यवस्थेला बसला आहे. २०१५च्या तिसऱ्या तिमाहीत आर्थिक विकास दर ६.९ टक्के इतका खाली आला असे चीनच्या नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स या संस्थेने जाहीर केले. सरकारने या वर्षी एकूण देशांतर्गत उत्पन्नाचे लक्ष्य सात टक्के इतके ठेवले होते. पहिल्या तीन तिमाहीत हे उत्पन्न ४८.७८ ट्रिलियन युआन (७.६८ ट्रिलियन युआन) होते. एनबीएसचे प्रवक्ते शेंग लाययून यांनी सांगितले, की जागतिक घटकांमुळेही चीनच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. अमेरिकेने वाढवलेले व्याज हे एक कारण ठरले, त्यामुळे वस्तू, रोखे व परकीय चलनाचे दर अस्थिर झाले. त्यामुळे चीनच्या निर्यातीवर परिणाम झाला. चीनची निर्यात पहिल्या तीन तिमाहीत १७.८७ ट्रिलियन युआन होती ती ७.९ टक्के राहिली. पहिल्या नऊ महिन्यांत औद्योगिक उत्पादन ६.२ टक्के होते तर स्थावर मालमत्ता गुंतवणूक १०.३ टक्के होती. मालमत्ता गुंतवणूक वाढ २.६ टक्क्यांनी वाढली, किरकोळ विक्री वाढ १०.५ टक्के झाली. निर्यात कमी झाल्याने चीनची अर्थव्यवस्था आता देशांतर्गत मागणीवर अवलंबून आहे. निरीक्षकांच्या मते एकूण देशांतर्गत उत्पादन ६.९ टक्के इतके खाली येण्याने आता सरकारकडून धोरणकर्त्यांवर पतधोरण बदलण्यासाठी दबाव येणार आहे.