आर्थिक मंदीसदृश स्थितीचा फटका ऐन सणोत्सवात सोन्याच्या मागणीला बसला आहे. सप्टेंबरअखेर तिमाहीत देशाची सोने मागणी ३२ टक्क्यांनी घसरून १२३.९० टन नोंदली गेली आहे. मौल्यवान धातूच्या वाढलेल्या किमतीचाही विपरीत परिणाम सोने खरेदीवर झाला आहे.

‘जागतिक सुवर्ण परिषदे’चा सोने मागणीचा जगभरातील कल मंगळवारी एका अहवालाद्वारे स्पष्ट करण्यात आला. यामध्ये भारताच्या सोने खरेदी-विक्रीचा आढावा घेताना जून ते सप्टेंबर तिमाहीत सोने मागणी रोडावल्याचे स्पष्ट करण्यात आले.

भारत हा चीननंतरचा दुसरा मोठा सोने आयातदार आहे. भारताने तिसऱ्या तिमाहीत सोने आयातीत ६६ टक्के घसरण नोंदवत केवळ ८०.५ टन सोने आयात केली आहे.

देशांतर्गत सोन्याच्या किमती सप्टेंबरमध्ये प्रति तोळा ३९,०११ रुपयांवर होत्या. सध्या त्या ३८ हजार रुपयांच्या घरात आहेत. २०१९ मधील दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहीत मौल्यवान धातूच्या दरांमध्ये २० टक्क्यांची वाढ झाली असून, त्याचा मागणीवर परिणाम झाला आहे.