चालू वर्षांत अवघी ९.१ टक्के वेतनवृद्धी अपेक्षित; भारतातील परिस्थिती तुलनेत स्वस्थ

उद्योग क्षेत्रावरील आर्थिक मंदीचे मळभ चालू वर्षांतही कायम राहण्याच्या चिंतेने देशातील कंपन्यांनी २०२० मध्ये कर्मचाऱ्यांची वेतनवाढ एकेरी अंकवृद्धीच्या आतच ठेवण्याबाबतचे चित्र समोर आले आहे. ९.१ टक्के वेतनवाढीचे प्रमाण हे आशियात सर्वाधिक असेल, असेही याबाबतच्या एका सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. याबाबत आघाडीची मनुष्यबळ सल्लागार कंपनी एऑनच्या वार्षिक वेतनवाढ सर्वेक्षणात ही बाब नमूद करण्यात आली असून यानुसार चालू वर्षांतील वेतनवाढ ही दशकातील किमान असेल.

यापूर्वी, गेल्या वर्षांतही ९.३ टक्के असे वेतनवाढीचे प्रमाण हे गेल्या १० वर्षांतील किमान स्तरावरील होते, याची आठवणही या सर्वेक्षणाने करून दिली आहे. कर्मचाऱ्यांमधील कुशलतेला कंपन्या वर्ष २०२० मध्येही प्राधान्य देणार असून परिणामी तुलनेत वेतनवाढीचा वेग कमी असेल, असे स्पष्टीकरण सर्वेक्षणातून करण्यात आले आहे.

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या एकूण कंपन्यांपैकी ३९ कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना २०२० वर्षांत १० टक्के वेतनवाढ मिळेल, असे मत नोंदविले आहे. तर ४२ टक्के कंपन्यांनी चालू वर्षांत ८ ते १० टक्के वेतनवाढ असेल, असे मत व्यक्त केले आहे. एऑनने विविध २० उद्योग क्षेत्रातील १,००० कंपन्यांमधून याबाबतचे सर्वेक्षण केले. यामध्ये आशियात सर्वाधिक वेतनवाढ होणार असल्याचे दिसून आले. तर भारतानंतर चीनमधील वेतवाढीचे प्रमाण (६.३ टक्के) अधिक असेल. भारतात यापूर्वी सर्वात कमी, ६.६ टक्के वेतनवाढीचे प्रमाण २००९ मध्ये नोंदले गेले आहे.

आशियात फिलिपाईन्स देशातील वेतनवाढीचा अंदाज ५.८ टक्के तर मलेशियातील ५.३ टक्के, सिंगापूरमधील ३.८ टक्के वेतनवाढीचा अंदाज आहे. गेल्या वर्षांतील आर्थिक आव्हान पाहता भारताबाबत चालू वर्षांची स्थिती उत्तम असेल, असा आशावाद सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. देशातील सर्वाधिक वेतनवाढीकरिता भारताची वाढती महागाई आणि तुलनेत कमी कुशल मनुष्यबळ आदी निमित्त असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

भारतात सर्वाधिक वेतनवाढ ही निर्मिती क्षेत्र, औषधनिर्माण, रसायन क्षेत्रात असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तुलनेत इ-कॉमर्स तसेच व्यावसायिक सेवा असलेल्या क्षेत्रात दुहेरी अंकात वेतनवाढ अधिक असेल, असेही नमूद करण्यात आले आहे.

एचएसबीसीमध्ये ३५ हजार रोजगारकपात :- सलग तिसऱ्या वर्षांत नफ्यातील घसरणीचा सामना करावे लागलेल्या चीनस्थित एचएसबीसीने तब्बल ३५ हजार रोजगार कपातीचे धोरण जाहीर केले आहे. या अंतर्गत आघाडीची बँक व वित्त कंपनीने तिचा अमेरिका व युरोपमधील व्यवसायही कमी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

एचएसबीसी घसरत्या नफ्यापोटी खर्च कमी करण्याचे धोरण अंगिकारले आहे. अमेरिका-चीन व्यापार युद्ध, युरोपीय समुदायातून ब्रिटनचे बाहेर पडणे आणि आता चीनमधून फोफावणारा करोना विषाणू या वेगवान विपरित घडामोडींमुळे एचएसबीसीला व्यवसाय धोरणाबाबत पुनर्विचार करावा लागल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. चीनमधील व्यवसाय योग्य रितीने सुरू असताना अमेरिका, युरोपमधील व्यवसाय मात्र कमी होत असल्याचे एचएसबीसीने नमूद केले आहे.

एचएसबीसी समूहातील विद्यमान एकूण कर्मचारी संख्या २,३५,००० असून ती येत्या तीन वर्षांत २ लाखांवर आणण्यात येईल, असे एचएसबीसीने स्पष्ट केल्याचे आंतरराष्ट्रीय वृत्त माध्यमांनी नमूद केले आहे. रोजगार कपात तसेच व्यवसाय पुनर्रचनेच्या अन्य माध्यमातून समूह २०२२ पर्यंत खर्चातील कपातही ४.५ अब्ज डॉलपर्यंत करेल, असे याबाबतच्या वृत्तात म्हटले आहे.

एचएसबीसीला २०१९ मध्ये १३.३ अब्ज डॉलर नफा झाला असून तो वार्षिक तुलनेत ३३ टक्क्यांनी कमी आहे. तर गेल्या वर्षांच्या शेवटच्या तिमाहीत आंतरराष्ट्रीय वित्त संस्थेला करपूर्व ३.९ अब्ज डॉलर तोटा झाला होता.