‘झायकॉम इलेक्ट्रॉनिक सिस्टिम्स’ची सुरक्षाविषयक उत्पादने आता मोठय़ा रीटेल दुकानांमध्ये (लार्ज फॉरमॅट रीटेल स्टोअर्स) उपलब्ध होणार आहेत. घराच्या सुरक्षिततेची खबरदारी घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांची श्रेणी अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘झायकॉम’ने ‘विजय सेल्स’ या साखळी रीटेल दुकानाशी भागीदारी केली आहे.
‘झायकॉम’चे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद राव म्हणाले, ‘‘घरांमध्ये इलेक्ट्रॉनिक सुरक्षा उपकरणे बसवून घेण्यास ग्राहक पसंती देत आहेत. मात्र ही उपकरणे बसवून घेण्याआधी त्यांना ती कशी काम करतात हे प्रत्यक्ष पाहायचे असते. त्यासाठीच ही उत्पादने मोठय़ा रीटेल दुकानांमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय आम्ही घेतला.’’

गजबजलेल्या स्कूटर बाजारपेठेला महिंद्रची ‘गस्टो’ धडक!
मुंबई : वेगाने वाढणाऱ्या आणि स्पर्धकांची भाऊगर्दी असलेल्या गिअरलेस स्कूटर बाजारात काहीशा उशिराने दमदार टक्कर देण्याची तयारी महिंद्र समूह करत आहे. कायनेटिकला ताब्यात घेतल्यानंतर डय़ुरो, रोडिओ, फ्लाईटद्वारे सध्या या क्षेत्रात महिंद्र अस्तित्व राखून आहे. गिअरलेस स्कूटरमधील स्वतंत्र निर्मिती असलेली महिंद्रची पहिली व बहुप्रतिक्षित ‘गस्टो’ ही स्कूटर येत्या २९ सप्टेंबरपासून दाखल करण्यात येत असल्याचे मंगळवारी जाहीर करण्यात आले आहे. ११० सीसी इंजिन क्षमता असलेल्या या स्कूटरच्या बोधचिन्हाचे अनावरण मुंबईत कंपनीच्या दुचाकी व कृषी उपकरण विभागाचे कार्यकारी अधिकारी राजेश जेजुरीकर व मुख्य परिचलन अधिकारी वीरेन पोपली यांनी केले.

‘फोक्सवॅगन’चा ‘मेकॅट्रॉनिक्स अप्रेंटिसशिप प्रोग्रॅम’ सुरू
पुणे: ‘फोक्सवॅगन’च्या पुण्यातील कारखान्यात विद्यार्थ्यांसाठीच्या ‘मेकॅट्रॉनिक्स अप्रेंटिसशिप प्रोग्रॅम’चा अभ्यासक्रम सुरू झाला आहे. हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांची ही चौथी तुकडी असून १६ विद्यार्थ्यांची त्यासाठी निवड करण्यात आली आहे. यात चार मुलींचा समावेश आहे. ‘मेकॅट्रॉनिक्स अप्रेंटिसशिप प्रोग्रॅम’ हा साडेतीन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या जर्मन प्रारूपावर या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. दहावी इयत्तेत विज्ञान व गणितात ७० टक्क्य़ांहून अधिक गुण मिळवलेल्या आणि ‘फोक्सवॅगन अॅकॅडमी’तर्फे  घेतल्या जाणाऱ्या लेखीपरीक्षेत व मुलाखतीत उत्तीर्ण होणाऱ्या १६ विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश व कारखान्यात कामाचा प्रत्यक्ष अनुभव दिला जातो.