भारतीय नौदलाला आयातीवर अवलंबून राहावे लागणाऱ्या युद्धनौकांच्या निर्मितीसाठी आवश्यक पोलादाची भारतात निर्मिती अशक्यप्राय काम करून दाखविल्याबद्दल कृष्णा इंडस्ट्रीजचा नवी दिल्लीतील डीआरडीओ भवन येथे आयोजित समारंभात पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कृष्णा इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अश्विन शाह यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘डिफेन्स टेक्नॉलॉजी अब्जॉर्पशन अ‍ॅवार्ड २०१३’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी अर्थ आणि संरक्षणमंत्री अरुण जेटली हेही उपस्थित होते. कृष्णा इंडस्ट्रीजने तिच्या संशोधन व विकास विभागाचे प्रयत्न आणि डीआरडीओच्या समर्थनासह ‘डीएमआर २४९ए बल्ब बार्स’ नावाच्या वैशिष्टय़पूर्ण पोलादाची निर्मिती हलोल, गुजरात येथील प्रकल्पातून केली असून, ते युद्धनौकांच्या उभारणीत आयातपर्यायी घटक म्हणून वापरात येणार आहे. आजवर भारतीय नौदलाकडून यासाठी रशियाकडून पोलाद आयात करावे लागत होते, ही आयात यापुढे बंद करण्याबाबत सध्या विचार सुरू झाला आहे. उल्लेखनीय म्हणजे देशात निर्मित पोलादापासून युद्धनौका बनविणारा जगातील पाच देशांच्या पंक्तीत भारताला स्थान मिळणार आहे. अश्विन शाह यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे चीनसारख्या देशालाही अद्याप ही कामगिरी साधता आलेली नाही.
अ‍ॅक्सिस बँकेकडून एटीएमची ‘ई-पाळत’!
मुंबई: बँकांच्या एटीएम केंद्रांसाठी अतिरिक्त सुरक्षेसाठी खर्चात वाढ म्हणून आगामी महिन्यापासून ग्राहकांच्या नि:शुल्क एटीएम उलाढालींना कात्री लागली असताना, खासगी क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने समर्थित ‘ई-पाळती’ची सुविधा आपल्या एटीएम परिसरात केली आहे. अहोरात्र जागता पहारा देणारी ही सुविधा सीसीटीव्ही यंत्रणा, मायक्रोफोन, स्पीकर्स या आधारे आणि केंद्रीय नियंत्रित स्वयंचलित सुरक्षा उपाययोजनेवर बेतलेली आहे. या सुविधेत एटीएम परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल अथवा घुसखोरी दिसल्यास स्थानिक पोलीस ठाण्याला विनाविलंब सूचित केले जाते, तसेच गस्तीवर असणाऱ्या अधिकाऱ्यांनाही घटनेची माहिती दिली जाते.
‘इन्मेक्स एसएमएम इंडिया’तून सागरी व्यापारातील नव्या संधींचा धांडोळा
मुंबई: भारताच्या सागरी व्यापाराशी निगडित आगामी सहा वर्षांत प्रगतीच्या शक्यता लक्षात घेता, या क्षेत्राशी निगडित दोन प्रदर्शनांनी एकत्र ‘इन्मेक्स एसएमएम इंडिया’ असे संयुक्त व्यासपीठ जगभरच्या सागरी व्यापार क्षेत्राला उपलब्ध केले आहे. इन्मेक्सचे आयोजन करणाऱ्या इन्फॉर्मा एक्झिबिशनने यासाठी जर्मनीच्या हॅम्बर्ग मेसे आणि काँग्रेस जीएमबीएच या कंपन्यांशी सामंजस्य करीत या पहिल्या ‘इन्मेक्स एसएमएम’चे आयोजन येत्या २३ ते २५ सप्टेंबर २०१४ दरम्यान मुंबई प्रदर्शन संकुल, गोरेगाव येथे केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्पिलेल्या बंदरसमर्थित आर्थिक विकासाच्या प्रारूपामुळे सागरी व्यापाराला भरपूर चालना मिळणार असून, बंदरांना जोडलेले विशेष आर्थिक क्षेत्रे (सेझ), रेल्वे, रस्ते, जलमार्गाचे जाळेही विणले जाणार आहे. यातून बंदरांमध्ये २०१३ मध्ये झालेली ९३.५ कोटी टनांची माल हाताळणी ही २०२० र्प्यत २५० कोटी टनांवर जाणे अपेक्षित असल्याचा अंदाज आहे. याच संधीचा फायदा घेण्यासाठी विविध ४० देशांमधील सुमारे ५०० प्रदर्शक या उपक्रमात सहभागी होणार आहेत.
सिग्ना टीटीके कंपनीचा पाच शहरांमध्ये विस्तार
मुंबई: जागतिक आरोग्य सेवा कंपनी सिग्ना कॉर्पोरेशन व भारतीय समूह टीटीके ग्रुप यांचा संयुक्त उद्यम असलेल्या सिग्ना टीटीके हेल्थ इन्शुरन्सने विस्तारीकरण योजनेचा भाग म्हणून देशातील अहमदाबाद, चंदिगड, कोईम्बतूर, कोचीन व पुणे येथे नव्या शाखा सुरू करण्याची घोषणा केली. कंपनीचे सध्या मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई व बंगळुरू येथे अस्तित्व आहे. सिग्ना टीटीके हेल्थ इन्शुरन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक संदीप पटेल यांनी सांगितले की, कंपनीने यानिमित्ताने ‘प्रोअ‍ॅक्टिव्ह लिव्हिंग’ कार्यक्रमही दाखल केला आहे. यामुळे ग्राहकांना त्यांच्या आरोग्यदायी गरजांना उद्देशून अशी उत्पादने उपलब्ध होतील.
जेएनपीटीच्या संचालकपदी सुरेश हावरे
मुंबई: अणुशास्त्रज्ञ आणि बांधकाम व्यावसायिक सुरेश हावरे यांची जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या (जेएनपीटी) संचालकपदी नियुक्ती घोषित करण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते व नौकानयनमंत्री नितीन गडकरी यांनी नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही घोषणा केली. हावरे यांची तंत्रज्ञानात्मक पाश्र्वभूमी व कुशल प्रशासकीय अनुभवाचा जेएनपीटीला नक्कीच उपयोग होईल, अशी प्रतिक्रिया जेएनपीटीचे अध्यक्ष एन. एन. कुमार यांनी या नियुक्तीचे स्वागत करताना व्यक्त केली. जेएनपीटीच्या अन्य नवनियुक्त संचालकांमध्ये महेश बालदी (उरण), विवेक देशपांडे (औरंगाबाद) आणि अविनाश देव (वर्धा) यांचा समावेश आहे.