31 March 2020

News Flash

आठवडय़ाची मुलाखत : लघुउद्योजकांसाठी तंत्रज्ञानाचे गगन ठेंगणे!

२५० पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या उद्योगाला मध्यम उद्योग म्हटले जाते.

पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करत काम करणाऱ्या लघु उद्योजकालाही स्पध्रेत टिकाव धरण्यासाठी काळानुरूप बदलत तंत्रज्ञानाची साथ घ्यावी लागत आहे. पण सर्वच लघु उद्योजकांना तंत्रज्ञानासाठी भरीव गुंतवणूक करणे शक्य होते असे नाही. यामुळेच बडय़ा कंपन्या पुढे आल्या आहेत आणि त्यांनी लघु उद्योजकांना मदतीचा हात दिला आहे. यापैकी एक मायक्रोसॉफ्ट ही कंपनी आहे. या संदर्भात मायक्रोसॉफ्टचे स्मॉल अँड मिड-मार्केट सोल्युशन अँड पार्टनर्स अ‍ॅट मायक्रोसॉफ्ट ऑन टेक्नॉलॉजी एम्पॉवरिंग एसएमईजचे महाव्यवस्थापक अमित कुमार यांच्याशी केलेली बातचीत

भारतीय लघुउद्योजकांना तंत्रज्ञान कशा पद्धतीने मदत करू शकते?

सामान्यत: एक कोटीची मालमत्ता असलेला आणि ५० पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या उद्योगाला लघु उद्योग म्हटले जाते. तर २५० पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या उद्योगाला मध्यम उद्योग म्हटले जाते.

लघु व मध्यम उद्योग चेंबर ऑफ कॉमर्स आणि लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अहवाला नुसार देशात सध्या चार कोटी ८० लाख लघु व मध्यम उद्योग आहेत. ज्यांचे देशातील एकूण उद्योग उत्पादनांमध्ये ४५ टक्के योगदान आहे. तर देशातील निर्यातीत ४० टक्के योगदान आहे. या उद्योगांमुळे दरवर्षी  एक कोटी ३० लाख रोजगार निर्मिती होते.

या उद्योगांना आंतरराष्ट्रीय बाजारात स्थान मिळवण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाची मदत घेणे केव्हाही उपयुक्त ठरते. यामुळे उद्योगांची कमी वेळात जास्त काम करण्याची क्षमता वाढते. आजमितीस देशातील केवळ पाच टक्केच लघु उद्योगांचे ऑनलाइन अस्तित्व आहे.

या ऑनलाइन अस्तित्वाबरोबरच उद्योगांना दैनंदिन कामकाज सुलभ होण्यासाठी तंत्रज्ञानाची गरज भासते. याचबरोबर उत्पादनाचा दर्जा तपासणे आदी बाबींसाठीही तंत्रज्ञान मदत करू शकते. यामुळे कमी खर्चात जास्त काम होणे शक्य असते. यासाठी मायक्रोसॉफ्ट कंपन्यांना सहकार्य करत आहे.

देशातील लघु व मध्यम उद्योगांना तंत्रज्ञाना सुविधा पुरविण्यासाठी मायक्रोसॉफ्ट काय भूमिका बजावत आहे?

जगातील प्रत्येक व्यक्ती व प्रत्येक संस्था तंत्रज्ञानाने सक्षम बनली पाहिजे हे मायक्रोसॉफ्टचे ब्रीद वाक्य आहे. याच ब्रीद वाक्याला धरून मायक्रोसॉफ्ट देशातील लघु व मध्यम उद्योगांना विविध सुविधा पुरवित आहे. याची पंचसूत्री तयार करण्यात आली आहे. यात जागरूकता, परवडणाऱ्या दरात सुविधा देणे, मायाजालात सर्व संधी उपलब्ध करून देणे आणि प्रशासन यांचा समावेश आहे.

या सर्वामध्ये क्लाऊड तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.मायक्रोसॉफ्ट जगातील विविध ठिकाणांवर स्थानिक पातळीवर जाऊन क्लाऊड सेवा पुविणारी एकमेव कंपनी आहे. या सेवेसाठी आवश्यक असे माहिती केंद्र भारतात स्थापन करण्यात आले आहे.

क्लाऊड तंत्रज्ञानात आवश्यक असलेली ग्राहक माहिती सुरक्षा, प्रायव्हसी अँड कंट्रोल, पारदर्शकता या गोष्टींची काळजी कंपनीतर्फे घेतली जाते. या माध्यमातून कंपनी लघु व मध्यम उद्योगांना सीआरए, आर्थिक व्यवस्थापन, मनुष्यबळ व विकास आणि पगाराचे व्यवस्थापन या विभागात सेवा पुरविते.

यात कंपनीला ऑफिस ३६५चे संपूर्ण पॅकेजही उपलब्ध करून दिले जाते. तर ‘स्मार्टर बिझ’ या सेवेच्या माध्यमातून कंपनीला त्यांच्या ग्राहकांशी संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करून दिले जाते. तर अंतर्गत परिक्षणासाठीही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कंपनी त्यांच्या गरजेनुसार ज्या सुविधा घेते त्या सुविधांचे पैसे मायक्रोसॉफ्टतर्फे आकारले जातात.

सध्या २५० हून अधिक उद्योगांना विविध सेवा पुरविल्या जात आहेत. यामुळे सरकाच्या मेक इन इंडिया या मोहिमेला विशेष बळ मिळणार आहे.

तुम्ही मेक इन इंडियाच्या धोरणाकडे कसे पाहता?

सरकारने जाहीर केलेल्या मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी व्यवसाय करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करण्याचे काम सुरू आहे. सरकाच्या नव्या धोरणात पारंपरिक संकल्पना छेद देत उद्योग ऑनलाइनवर चोवीस तास काम करू शकणार आहेत.

यासाठी सरकारने स्मार्ट सिटीसरख्या योजनाही आणल्या आहेत. यामुळे उद्योगांना नव्या संधी निर्माण होणार आहेत. पण या सर्वाबरोबरच उद्योग तंत्रज्ञान सक्षम होणेही आवश्यक आहे.

तंत्रज्ञान स्वीकारण्यास लघु उद्योजक तयार आहेत का?

तंत्रज्ञान स्वीकारण्यास उद्योजकांची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. आज त्यांच्याकडे तंत्रज्ञान नसल्यामुळे अनेक अडचणींना  सामोरे जावे लागत आहे किंवा ते काम करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागत आहे. पण तंत्रज्ञानाचा वापर करून काम सोपे होते हे त्यांच्या लक्षात आल्यावर ते तंत्रज्ञानाचा स्वीकार करतील. याचे उदाहरण द्यायचे झाले तर दिल्ली, हरयाणा येथील नळाचे उत्पादन करणाऱ्या कंपनीमध्ये सर्व कामकाज हे ऑफलाइन चालते.

तेथे एका एक्सेलच्या फाइलमध्ये सर्व ग्राहकांचे क्रमांक सेव्ह केलेले आहेत. ज्याचा वापर एका वेळी एकाच कर्मचाऱ्याला करता येतो. पण अत्याधुनिक उत्पादन कालावधीत अशा प्रकारे काम केले जाऊ शकत नाही.

केवळ हीच कंपनी नव्हे तर इतर अनेक लघु उद्योगांना या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. येत्या काळात उद्योगाला गती देण्यासाठी तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. यामुळे उद्योग तंत्रज्ञान सक्षम करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट प्रयत्नशील आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2017 12:31 am

Web Title: small businessman
Next Stories
1 निर्देशांकाचा सप्ताहप्रारंभ नरमाईने
2 नोटाबंदीने कर्जवसुलीत दिरंगाई, विलीनीकरणही लांबणीवर!
3 निफ्टीलाही ‘व्हॅलेंटाइन’ शुभेच्छा !
Just Now!
X