वाय. एम. देवस्थळी यांचे उद्योगांसाठी स्फूरणोद्गार

लघु व मध्यम उद्योगाचा देशाच्या विकास दरात सिंहाचा वाटा असल्याचे सर्वमान्य असले तरी काहीशा दुर्लक्षित या घटकाकडे डोळसपणे पाहण्याची आवश्यकता एल अँड टी फायनान्शिअल होल्डिंग्जचे माजी अध्यक्ष वाय. एम. देवस्थळी यांनी मंगळवारी मांडली. ‘लोकसत्ता : बदलता महाराष्ट्र’च्या ‘लघुउद्योगाची क्षमता आणि आव्हाने’ या दोन दिवसांच्या परिषदेचा समारोप देवस्थळी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. भांडवल उभारणी, वित्त पुरवठा, सुसंगत तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ या लघुउद्योजकांना भेडसावणाऱ्या आव्हानांवर संघटितरित्या मात करणे शक्य असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

‘केसरी’ प्रस्तुत व ‘एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स’ व ‘एनकेजीएसबी बँक’ सहप्रायोजक असलेल्या या परिषदेच्या मंचावर ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर हेही उपस्थित होते. परिषदेच्या दुसऱ्या दिवशीही लक्षणीय उपस्थिती नोंदविणाऱ्या लघुउद्योजकांनी यावेळी उद्योग वाढीबाबतच्या आपल्या शंकांचे समाधान प्रमुख पाहुण्यांना प्रश्न विचारून करून घेतले.

देवस्थळी म्हणाले की, लघुउद्योजकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये सरकारशी संबंधित नियमावली आदींचाही समावेश आहे. मात्र व्यक्तिगत पातळीवर अशा समस्यांचा निपटारा अशक्य असून लघुउद्योजक एकत्रितरित्या समोर आले तर काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल. किंबहुना लघुउद्योजकांनाही एकत्रितरित्या तसेच भागीदारीच्या माध्यमातून भांडवल उभारणी, विपणन-मनुष्यबळ आदीकरिताही पूरक सुलभता मिळू शकेल. आपण उभे केलेल्या, वाढवलेल्या उद्योगाला यशस्वी वारसदार मिळवून प्रसंगी त्यातून समाधानाने बाहेर पडण्याचे धाडसही यशस्वी उद्योजकाने दाखवायला हवे, असेही देवस्थळी म्हणाले.