सहकार क्षेत्रातील शिवालिक मर्कन्टाइल को-ऑपरेटिव्ह बँकेला खासगीकरणाचा मार्ग अनुसरून, ‘स्मॉल फायनान्स बँक’ म्हणून कार्य करण्याला रिझव्‍‌र्ह बँकेने तत्त्वत: मंजुरी दिली. बुधवारी सायंकाळी या संबंधाने मध्यवर्ती बँकेकडून प्रसिद्धीपत्रकान्वये घोषणा केली. ऐच्छिक संक्रमण योजनेंतर्गत सहकारातून खासगीकरण असे परिवर्तन होत असलेली ही पहिलीच नागरी सहकारी बँक आहे.

उत्तर प्रदेशातील सर्वात मोठी बहुराज्यात विस्तार असलेली नागरी सहकारी बँक असलेल्या शिवालिकने सर्वप्रथम आर. गांधी समितीच्या शिफारशींनुसार, स्मॉल बँक परवाना मिळविण्यासाठी मध्यवर्ती बँकेकडे अर्ज दाखल केला होता. आता रिझव्‍‌र्ह बँकेकडून तत्त्वत: मंजुरी म्हणजे खासगीकरणाकडील संक्रमणाच्या अंतिम टप्प्यात तिने प्रवेश केल्याचेच द्योतक आहे.

तत्त्वत: मंजुरीचा एक भाग म्हणून आवश्यक गोष्टींची पूर्तता करण्यासाठी शिवालिकला १८ महिन्यांचा कालावधी दिला जाईल. पण बँक अपेक्षेपेक्षा लवकर या बाबींची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि एप्रिल २०२१ च्या पूर्वीच स्मॉल फायनान्स बँक म्हणून बँक व्यवसाय सुरू करेल, असा विश्वास शिवालिक मर्कन्टाइल को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुवीर कुमार गुप्ता यांनी व्यक्त केला.
शंभर कोटी अथवा त्याहून अधिक स्वनिधी असलेल्या नागरी सहकारी बँकांना स्वेच्छेने ‘स्मॉल फायनान्स बँक’ म्हणून संक्रमण व कार्यान्वयनाची मुभा रिझव्‍‌र्ह बँकेने गांधी समितीच्या शिफारशीनुसार दिली आहे. २२ वर्षे जुन्या आणि चार लाख सभासद असलेल्या शिवालिकचा ३१ मार्च २०२० अखेर एकूण व्यवसाय १,८०० कोटी रुपयांचा आहे. तर सध्या कार्यरत १,५०० नागरी सहकारी बँकांमध्ये १०० कोटींपेक्षा अधिक स्वनिधी असलेल्या बँकांची संख्या साधारण ९०० इतकी आहे. शिवालिकपाठोपाठ मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेनेही ‘स्मॉल फायनान्स बँक’ बनण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.

तीन बिगर बँकिंग वित्त कंपन्यांचे परवाने रद्द

रिझव्‍‌र्ह बँकेने गुरुवारी तीन बिगर बँकिंग वित्त कंपन्यांची नोंदणी रद्द केली. तर सहा अन्य बिगर बँकिंग वित्त कंपन्यांनी त्यांचे व्यवसाय परवाने स्वत:हून रद्द केले. मध्यवर्ती बँकेने रद्द केलेल्या परवान्यांपैकी दोन कंपन्या उत्तर प्रदेशमधील तर एक आसाममधील आहे. तर स्वत:हून व्यवसाय परवाने रिझव्‍‌र्ह बँकेकडे सुपूर्द करणाऱ्या सहा बिगर बँकिंग वित्तसंस्थांमध्ये गुंतवणूक, स्थावर मालमत्ता कंपन्या, दलाली पेढय़ा आहेत.