नागपूरमध्ये शाखा; वर्षभरात १,००० नोकरभरतीचे नियोजन

उत्तर भारतात कार्यरत सूक्ष्म वित्तसंस्था, उत्कर्ष मायक्रो फायनान्सने रिझव्‍‌र्ह बँकेकडून लघू वित्तीय बँक (एसएफबी) म्हणून प्राप्त अंतिम परवान्यानुरूप प्रत्यक्ष व्यवसायाची रूपरेखा आखून सुसज्जता केली आहे. नवागत ‘उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँके’चे वाराणसी, पटणा, दिल्ली-एनसीआर आणि नागपूर अशा पाच शाखांसह औपचारिक कार्यान्वयनही झाले आहे.

येत्या काही महिन्यांत ठेवींसह सूक्ष्म, लघू व मध्यम (एसएमई) कर्जे आणि गृह कर्जे यावर विशेष लक्ष केंद्रित करीत १०० शाखा धोरणात्मक ठिकाणी स्थापण्याचे बँकेचे नियोजन आहे. उत्कर्ष एसएफबीतर्फे  ग्राहकांना ठेवींवर दिला जाणारा व्याजदर इतर बँकांपेक्षा (१ ते १.५ टक्के) जास्तच असेल. ग्राहकांना कर्ज, मुदत ठेवी, विमा आणि लॉकर्ससारख्या सेवा स्पर्धात्मक दरात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या शिवाय बँक गृहकर्जे, लहान आणि मध्यम उद्योगांना कर्जे आणि विमा उत्पादनांचे वितरण यांसारख्या सेवांमध्ये विस्तार करेल.

गेल्या एका वर्षांत, उत्कर्षने १,००० कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेतले आहे. शिवाय पुढील बारा महिन्यांत विस्तारलेल्या शाखांमधून व्यवसाय सुरू करण्यासाठी अतिरिक्त १,००० कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती यानिमित्ताने उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी गोविंद सिंग यांनी दिली.

आगामी १२ ते १५ महिन्यांत १४४ शाखा आणि १५० एटीएम सुरू केले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात १२ लाख ग्राहकांपर्यंत व्यवसाय पोहोचवायचा आहे. मार्च २०१८ पर्यंत २३ लाख ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. बँकेने २५ लाख रुपयांच्या कर्ज वितरणावर लक्ष केंद्रित केले आहे.