छोटय़ा-व्यक्तिगत गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात म्युच्युअल फंड, पेन्शन फंड या माध्यमातून गुंतवणूक करावी आणि हीच सर्वोत्तम पद्धतही असल्याचे सांगत, सेबी अध्यक्ष यू. के. सिन्हा यांनी प्रारंभिक खुल्या भागविक्री अर्थात ‘आयपीओ’मध्ये या गुंतवणूकदारांचा फारसा सहभाग नसणे, ही बाब चिंतेचा विषय नसल्याचा निर्वाळा दिला.
‘आयपीओ’ अर्थात कंपन्यांच्या प्रारंभिक समभागविक्रीच्या प्रक्रियेत गत काळात मोठय़ा गडबडी व गैरव्यवहाराचे प्रयत्न झाले आहेत. अर्थात भांडवली बाजार नियंत्रक या नात्याने सेबीने बाजाराच्या प्रारंभिक अंगात छोटय़ा व व्यक्तिगत गुंतवणूकदारांच्या हितरक्षणाच्या दृष्टीने शक्य ती सर्व पावले टाकली आहेत, असेही सिन्हा यांनी स्पष्ट केले. या छोटय़ा गुंतवणूकदारांचा बाजारावर विश्वास दीर्घ काळाकरिता टिकून राहावा, यालाच आपल्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्व आहे, अशी सिन्हा यांनी पुस्ती जोडली.
मुंबईत ‘५नान्स डॉट कॉम’ आयोजित परिसंवादात बोलताना सिन्हा म्हणाले, ‘शेअर बाजारात एक सुज्ञ गुंतवणूकदार म्हणून छोटय़ा मंडळींचा प्रवेश अभिप्रेत आहे आणि म्युच्युअल फंड अथवा पेन्शन फंडसारख्या माहितगार व अनुभवी व्यावसायिक सेवेत असलेल्या संस्थांच्या मार्फत जर हा प्रवेश होत असेल, तर ती आदर्शच पद्धती आहे.’ विश्वासार्हता, सोयीस्करता, गुंतवणूक सुलभता आणि शिक्षण-प्रबोधन या गोष्टीच बाजारात अधिकाधिक लोकांच्या गुंतवणुकीला आकर्षित करणारी ठरेल, असे त्यांनी सांगितले.
‘सेबी’च्या देखरेख विभागाच्या कामगिरीची माहिती देताना ते म्हणाले, दर दिवशी या विभागाला सरासरी १०० चुकीच्या अथवा अवैध व्यवहारांची वर्दी (अ‍ॅलर्ट्स) मिळत असते.

‘डायरेक्ट प्लॅन्स’ना प्रोत्साहन मिळत नसल्याबद्दल खंत
ई-व्यापारासारख्या आधुनिक व सध्या लोकप्रिय असलेल्या मंचांवरून म्युच्युअल फंडांच्या योजनांचीही विक्री होईल, अशा व्यवहार सुलभतेसाठी आपण प्रयत्नशील असल्याचा सिन्हा यांनी पुनरुच्चार केला. नवयुवकांमध्ये बाजारातील गुंतवणुकीबाबत सुज्ञतेने निर्णय घेण्याची समज निश्चितच आहे, पण या मंडळींनी थेट गुंतवणूक करता येईल अशा ‘डायरेक्ट प्लॅन्स’ना फंड उद्योगाकडून प्रोत्साहन मिळत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. म्युच्युअल फंड वितरकांच्या तावडीतून गुंतवणूकदारांच्या मुक्ततेला या उद्योगांतून चालना मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. गुंतवणूक सुलभतेसाठी तंत्रज्ञानाचा कसा व कितपत फायदा मिळविता येईल, याची चाचपणी करण्यासाठी आपण नंदन नीलेकणी यांच्या नेतृत्वाखाली एक संघ बनविला असल्याचे त्यांनी सांगितले. जर मोबाइल फोनचा वापर सर्रासपणे खरेदी-विनिमयासाठी जेथे सुरू आहे, तेथे फोनवरून म्युच्युअल फंडाची खरेदी का शक्य नसावी, असा त्यांनी सवाल केला.