एसआयपीमार्फत जूनमध्ये ४,९०० कोटींची गुंतवणूक; विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांविना तेजी

भांडवली बाजारातील तेजीचे यंदाचे वर्ष निरंतर सुरू असून, सेन्सेक्सने ३२ हजारांपल्याड तर निफ्टीने १०,१०० जवळ मारलेली विRमी मजल ही मुख्यत: छोटय़ा व्यक्तिगत गुंतवणूकदारांच्या आस्था आणि गुंतवणूक पाठबळावरच गाठली गेली आहे. उत्साहवर्धक बाब म्हणजे हे छोटे गुंतवणूकदार बाजारात थेट गुंतवणूक करून नव्हे तर म्युच्युअल फंडातील ‘एसआयपी’च्या माध्यमातून या तेजीवर स्वार झाले आहेत. भारतीय भांडवली बाजार १९९२ साली विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांसाठी खुला झाल्यापासून, त्यांच्या लक्षणीय सहभागाविना सुरू राहिलेली बाजार तेजी असेही निर्देशांकाचे विद्यमान घोडदौडीचे खास वैशिष्टय़ सांगितले जात आहे.

विदेशी संस्थांगत गुंतवणूकदारांनी जरी चालू वर्षांत बाजारात चांगली खरेदी केली असली, तरी देशांतर्गत सुरू राहिलेला निरंतर गुंतवणूक ओघ हे विद्य्मान तेजीचे सर्वात लक्षणीय वैशिष्टय़ आहे. किंबहुना बाजाराच्या प्रत्येक घसरणीत या देशांतर्गत खरेदीने आधार दिल्याचे यावेळी जितक्या प्रकर्षांने दिसून आले आहे, तितके यापूर्वी अभावानेच दिसले आहे, असे बिर्ला सनलाइफ म्युच्युअल फंडाचे मुख्याधिकारी आणि म्युच्युअल फंड उद्योगाची संघटना अँम्फीचे अध्यक्ष ए. बालासुब्रह्मण्यन यांनी सांगितले.

‘बीएसई’कडील उपलब्ध आकडेवारीवरून, २०१७ सालात आजतागायत म्युच्युअल फंड, विमा कंपन्यांसह देशी संस्थांची निव्वळ समभाग खरेदी ही २४,००० कोटी रुपयांच्या घरात जाणारी आहे. २०१६ सालच्या याच कालावधीत झालेल्या ५,७०० कोटी रुपयांच्या खरेदीच्या ती जवळपास चारपटीने अधिक आहे. तर विदेशी गुंतवणुकीचा २०१७ सालातील  एकूण ५६,००० कोटी रुपयांचा ओघ हा २०१६ सालात याच कालावधीतील २७,८०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या तुलनेत जवळपास दुप्पट झाला आहे, असे सीडीएसएलकडून प्राप्त तपशिलावरून स्पष्ट होते.

बाजाराच्या या सातत्यपूर्ण तेजीने छोटय़ा गुंतवणूकदारांनाही मोठी भुरळ घातली आहे. तथापि त्यांनी चाणाक्षपणे म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून ही गुंतवणूक सुरू ठेवल्याचे यंदा दिसत असून, ही मोठी कौतुकास्पद बाब असल्याचे सुब्रह्मण्यन यांनी मत व्यक्त केले. उपलब्ध तपशिलावरून सरलेल्या जून २०१७ या केवळ एका महिन्यांत म्युच्युअल फंडांच्या ‘एसआयपी’ बाजारात सुमारे ४,९०० कोटी रुपयांची गुंतवणूक आली. साधारण १.५ गुंतवणूकदारांच्या एसआयपी खात्यातील हा निधी होता आणि त्यापैकी ८५ टक्के खाती ही इक्विटी अर्थात समभागसंलग्न फंडाची होती. उल्लेखनीय म्हणजे या गुंतवणुकीने जून महिन्यांतील विदेशी संस्था सुमारे ३,६०० कोटींच्या गुंतवणुकीलाही मात दिली.

अनेक नवे गुंतवणूकदार बाजारात प्रवेशासाठी हा मार्ग अनुसरत असल्याचा प्रत्यय दर महिन्याला एसआयपी गुंतवणुकीत होत असलेल्या २५० ते ३०० कोटी रुपयांची वाढीतून दिसून येत आहे. त्यामुळे निरंतर सुरू राहिलेल्या घोडदौडीनंतर बाजाराने काहीसा विराम घेऊन घसरण दाखविली तरी ती घसरण फार मोठी नसेल, असा विेषक कयास व्यक्त करीत आहेत. किंबहुना नजीकच्या काळातील अशा कोणत्याही घसरणीला गुंतवणुकीची संधी मानून खरेदीच्या प्रतीक्षेत असलेला छोटय़ा गुंतवणूकदारांचा मोठा वर्ग कुंपणावर बसून आहे, असाही अनेकांचा होरा आहे.

पीएफमधून २२,५०० कोटींची यंदा गुंतवणूक

कर्मचारी भविष्य निधी संघटना अर्थात ईपीएफओने गेल्या दोन वर्षांतील भांडवली बाजारातील गुंतवणुकीवर प्राप्त उत्साहवर्धक परताव्यानंतर, चालू आर्थिक वर्षांत २२,५०० कोटींच्या गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवले आहे. अर्थात कामगारांच्या ‘पीएफ’चा हा पैसा शेअर बाजारात थेट न गुंतविता म्युच्युअल फंडाच्या एक्स्चेंज ट्रेडेड फंड अर्थात ईटीएफ योजनांमार्फतच गुंतविला जाणार आहे. सर्वप्रथम ऑगस्ट २०१५ पासून पीएफचा पैसा भांडवली बाजारात गुंतविण्यास सुरूवात झाली. त्यावेळी ईपीएफओकडील सुमारे १ लाख कोटींच्या गुंतवणूकयोग्य निधीतील केवळ ५ टक्के म्हणजे ६,५७७ कोटी रुपये बाजारात त्या आर्थिक वर्षांत गुंतविण्यात आले. नंतरच्या आर्थिक वर्षांत ५ टक्कय़ांची मर्यादा १० टक्कय़ांवर वाढविण्यात आली आणि २०१६—१७ मध्ये १४,९६४ कोटी रुपयांची ईटीएफमार्फत गुंतवणूक करण्यात आली. ईपीएफओला सरकारी रोखे आणि मुभा असलेल्या अन्य गुंतवणूक पर्यायातून जेमतेम वार्षिक ८ टक्के परतावा मिळत असताना, ईटीएफ गुंतवणुकीने सरासरी १३ टक्के परतावा दिला आहे. या भूमीवर केंद्रीय विश्व्स्त मंडळाच्या मे २०१७ मध्ये झालेल्या बैठकीने ईटीएफमधील गुंतवणुकीची मर्यादा १० टक्कय़ांवरून १५ टक्के करण्याची शिफारस केली आहे. त्यायोगे चालू वर्षांत बाजारात सुमारे २२,५०० कोटींची गुंतवणूक ही कामगारांच्या पीएफच्या पैशातून होऊ घातली आहे.