टाळेबंदीत शिथिलतेनंतर जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत देशातील स्मार्टफोनच्या विक्रीने सार्वकालिक उच्चांकी पाच कोटींच्या विक्रीचा टप्पा गाठला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे यात चिनी मोबाइल निर्मात्या कंपन्यांचा एकत्रित हिस्सा हा ७६ टक्क्य़ांची लक्षणीय मात्रा गाठणारा आहे.

सरलेल्या तिमाहीत सर्व पाच सर्वाधिक खपाच्या स्मार्टफोन नाममुद्रा अर्थात शाओमी, सॅमसंग, विवो, रिअलमी आणि ओप्पो यांनी मागील वर्षांच्या तुलनेत विक्रीत दमदार बहर अनुभवला आहे. अव्वल पाच नाममुद्रांपैकी चार चिनी तर एक कोरियन कंपनीच्या आहेत. बाजार संशोधक संस्था ‘कॅनालिस’ने प्रसिद्ध केलेल्या या आकडेवारीनुसार, एका तिमाहीत पाच कोटींपेक्षा अधिक स्मार्टफोनच्या विक्रीचा हा विक्रमच आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत भारतात ४ कोटी ६३ लाखांच्या विक्रीच्या तुलनेत यंदा विक्रीत ८ टक्क्य़ांची वाढ साधली गेली आहे.

भारत-चीन सीमेवरील तणाव आणि त्याचे देशभरातील पडसाद पाहता, चिनी स्मार्टफोन निर्मात्यांनी अधिक काटकसरीने व जपून पावले टाकण्यास सुरुवात केली. विपणन व जाहिरातीवरील खर्चात मोठी कपात त्यांनी केली. अनेकानेक सुटय़ा घटकांचे स्थानिकीकरण व देशांतर्गत निर्मितीतून त्यांनी भारताच्या आर्थिक भवितव्याच्या घडणीत त्यांचाही मोठा वाटा आहे, असे दर्शविणारी स्वत:ची प्रतिमा त्यांनी यानिमित्ताने पुढे रेटली, असेही कन्नन यांनी सांगितले.

भारताच्या स्मार्टफोन बाजारपेठेत सर्वाधिक २६.१ टक्के हिश्श्यासह शाओमीने दबदबा कायम राखला आहे. तिमाहीत त्यांचे १.३१ कोटी फोन विकले गेले. सॅमसंगने विवोकडून दुसरे स्थान हिरावून घेतले असून, तिमाहीत १.०२ कोटींच्या विक्रीचा (२०.४ टक्के बाजारहिस्सा) टप्पा गाठला. विवो १७.६ टक्के बाजारहिस्सा (तिमाहीत ८८ लाख फोनची विक्री) राखून तिसऱ्या स्थानावर, रिअलमी १७.४ टक्के बाजारहिस्सा (८७ लाख विक्री) आणि ओप्पो १२.१ टक्के बाजारहिस्सा (६१ लाख विक्री) अनुक्रमे चौथ्या व पाचव्या क्रमांकावर आहेत. अ‍ॅपलनेही दोन अंकी वाढीचा दर राखून तिमाहीत ८ लाख फोनच्या विक्रीची कामगिरी केली.

चिनी कंपन्यांचे चांगभलं

सीमेवरील गेल्या काही महिन्यांत वाढलेला तणाव आणि चीनविरोधात जनमानसांत संताप दिसून येत असला तरी त्याचा लोकांच्या स्मार्टफोन खरेदीच्या निर्णयावर फारसा परिणाम झाला असल्याचे दिसून येत नाही, असे कॅनालिस रिसर्चचे विश्लेषक वरूण कन्नन यांनी सांगितले. स्मार्टफोन बाजारपेठेतील चिनी मोबाइल निर्मात्या कंपन्यांचा एकत्रित हिस्सा कमी होण्याऐवजी उलट वाढला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत तो ७४ टक्के होता, तो यंदा सप्टेंबरअखेरीस ७६ टक्क्य़ांवर पोहोचला आहे. अर्थात एप्रिल-जून २०२० तिमाहीत चिनी कंपन्यांचा बाजारहिस्सा ८० टक्क्य़ांवर होता, तो तुलनेने घटला आहे, इतकेच!