ए. एम. नाईक यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपद

अभियांत्रिकी बांधकाम क्षेत्रातील आघाडीचा उद्योग समूह असलेल्या लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी नवनियुक्त एस. एन. सुब्रमण्यन हे शनिवारपासून स्वीकारणार आहेत. गेली तब्बल दोन दशके हे पद ए. एम. नाईक यांच्याकडे होते.

नाईक यांचे उत्तराधिकारी म्हणून सुब्रमण्यन यांच्या नियुक्तीला कंपनीच्या संचालक मंडळाने ७ एप्रिल रोजी मंजुरी दिली होती. गेल्या ५२ वर्षांपासून समूहात असलेल्या नाईक यांनी सलग १७ वर्षे कंपनीचे नेतृत्व केले.

समूह कार्यकारी अध्यक्ष म्हणून नाईक यांनी यापुढे मार्गदर्शन करावे, अशी विनंती संचालक मंडळाने केली होती. परिणामी येत्या १ ऑक्टोबरपासून नाईक हे समूहाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून असतील. ३० सप्टेंबर रोजी नाईक हे निवृत्त होणार असल्याने ते नव्या पदाची जबाबदारी यानंतर घेतील. नाईक यांच्या कारकीर्दीत समूह १७ अब्ज डॉलरचा बनला. तिचे अस्तित्व सध्या विविध ३० देशांमध्ये आहे.

नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रमण्यन हे कंपनीत सध्या उपव्यवस्थापकीय संचालक आहेत. नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली समूहाला अधिक उंचीवर नेऊन ठेवण्यात आपल्याला यश मिळेल, असा विश्वास सुब्रमण्यन यांनी व्यक्त केला आहे.

सुब्रमण्यन हे लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो समूहात १९८४ मध्ये प्रकल्प नियोजन अभियंता म्हणून रुजू झाले होते. अभियांत्रिकी व व्यवसाय व्यवस्थापनाचे शिक्षण त्यांनी अवगत केले आहे. कंपनीच्या संचालक मंडळात त्यांचा २०११ मध्ये प्रवेश झाला. त्यांच्या कारकीर्दीत समूहाच्या बांधकाम व्यवसाय विभागाने जागतिक क्षेत्रात २५ वी कंपनी म्हणून मान मिळविला.