आयआयएफएल वेल्थ हुरून इंडिया सर्वेक्षण

मुंबई : देशातील २५ अतिश्रीमंताचे भारताच्या १० टक्के संपत्तीवर स्वामित्व, तर ९५३ धनाढय़ांची एकत्रित संपत्ती ही भारताच्या ‘जीडीपी’चा २७ टक्के हिश्शाएवढी असल्याचे दर्शविणारा अभ्यास अहवाल बुधवारी पत्रकार परिषदेत सादर करण्यात आला.

विस्तृत सर्वेक्षणावर आधारित ‘आयआयएफएल वेल्थ हुरून इंडिया रिच लिस्ट’ नावाच्या अहवालात, अनेक धनाढय़ांनी वाढती गरीब-श्रीमंत विषमता ही सामाजिक असंतोषाच्या भडक्याचे कारण ठरेल, अशी भीती दहशतवादी हल्ल्यातून संभाव्य नुकसानीच्या भीतीच्या बरोबरीने व्यक्त केली आहे.

या अहवालासाठी देशभरातील अनेक श्रीमंतांच्या मुलाखती घेण्यात आल्या, त्यात त्यांच्या गुंतवणूक सवयी, व्यय पद्धती, त्यांचे राशिफल, संपत्ती व्यवस्थापन यासह त्यांना जाणवणारे भीतीदायी प्रसंग असाही प्रश्न करण्यात आला होता. त्यात पहिल्या क्रमांकावर दहशतवादी हल्ल्यातून संभाव्य नुकसान, त्यापाठोपाठ वाढत्या आर्थिक विषमतेतून सामाजिक असंतोषाच्या शक्यतेबाबत अनेकांनी भीती व्यक्त केल्याचे आढळून आले. तथापि, अर्थव्यवस्थेच्या विस्तारासह वाढत्या आर्थिक संधी, डिजिटलायझेशन व नव तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आणलेली सुकरता यातून अशा सामाजिक असंतोषाला तूर्तास कोणताही वाव दिसून येत नाही, असा निर्वाळा आयआयएफएल वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेडचे सह-संस्थापक व कार्यकारी संचालक यतीन शहा यांनी दिला.

देशातील अतिश्रीमंतांमध्ये बहुतांशांचा कल विदेशात गुंतवणुकीकडे आणि अमेरिकी डॉलर या मालमत्ता वर्गात गुंतवणुकीकडे असल्याचाही या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांत असल्याचे शहा यांनी सांगितले.

‘आयआयएफएल वेल्थ हुरून इंडिया रिच लिस्ट’मध्ये सलग आठव्या वर्षांत मुकेश अंबानी हे ३,८०,७०० कोटी रुपयांच्या संपत्तीसह अग्रस्थानी कायम आहेत. तर गेल्या वर्षभरात संपत्तीत ३३ टक्के वाढीसह गौतम अदानी (९४,५०० कोटी रुपये) यांनी पाचव्या स्थानावर उडी घेतली आहे. एसपी हिंदुजा, अझीम प्रेमजी, लक्ष्मी मित्तल हे अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या स्थानी आहेत.