‘लोकसत्ता-अर्थसत्ता’ वाचकांसाठी गुंतवणूक फराळाचा हा दुसरा भाग. पुढील मंगळवारी तो तिसरा व अंतिम असेल. या दुसऱ्या भागात सणासुदीला मिळणारा बोनस गुंतविण्यासाठी कोणत्या प्रकारच्या म्युच्युअल फंडांची निवड करावी या बद्दल मते मांडत आहेत फंड क्षेत्रातील तज्ज्ञ –
पसंती लार्ज कॅप योजनांना
मागील एका वर्षांचा विचार केल्यास मिड व स्मॉल कॅप योजनांचा समावेश असलेल्या योजनांनी २० ते ३० टक्के किंवा निवडक योजनांनी त्याहून अधिक परतावा दिला आहे. म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांची मानसिकता ही मागील परतावा पाहून फंडाची निवड करण्याची असते.
परंतु प्रत्येक म्युच्युअल फंडाच्या जाहिरात किंवा माहीती पत्रकात असलेल्या ‘मागील परताव्याचा दर भविष्यातील परताव्याची खात्री देत नसतो’ या वैधानिक इशाऱ्याशी फारकत घेऊन मागील परताव्याचा दर हाच फंडाची निवड करण्याचा निकष राहिलेला आहे.
भारतीय अर्थव्यवस्था उभरती असली तरी गुंतवणूकदारांनी प्रौढ होणे जरुरीचे आहे. गुंतवणूकदारांना गुंतवणूकविषयक सेवा देणारयातील आम्ही जगातीत एक प्रमुख सेवापुरवठादार असल्याने फंडाची निवड करण्याची एक विशिष्ट पद्धतीचा अवलंब आम्ही करीत असतो.
आमच्या फंडाची पत ठरविण्याच्या पद्धतीत मागील परताव्याच्या दराला स्थान असले तरी केवळ मागील परताव्याचा दर हा एकच निकष नसतो.
फंडाच्या पोर्टफ़ोलिओचा पीई, फंडाच्या संदर्भ निर्देशांकाच्या तुलनेत परताव्याचा दर, फंडाच्या उद्दिष्टांशी मिळकत किंवा उद्दिष्टाना छेद देणारी गुंतवणूक या सर्व गोष्टीचा अभ्यास करून एखाद्या फंडाची पत निर्धारित केली जाते.
मागील वर्षभराचा विचार केल्यास किंवा सप्टेंबर २०१३ ते ऑक्टोबर २०१५ या कलावधीत नवीन गुंतवणूक – प्रामुख्याने मिड कॅप फंडात आल्याने या समभागांचे मुल्यांकन खूपच वर गेले आहे. हे मुल्यांकन नवीन गुंतवणूक करण्यास खचितच आकर्षक आहे, असे मुळीच म्हणता येणार नाही.
नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणुकीचा कालावधी जोखीम सहन करण्याची क्षमता यांचा विचार करून आपल्याला साजेशा म्युच्युअल फंडाची निवड करणे योग्य असते. म्हणूनच केवळ मागील परताव्याचा विचार न करता मुल्यांकनाच्या पातळीवर विचार केल्यास नवीन गुंतवणूक करण्यासाठी ८० ते ८५ टक्के गुंतवणूक लार्जकॅप व उर्वरीत १५ ते २० टक्के गुंतवणूक मिडकॅप मध्ये असलेल्या योजना योग्य वाटतात.
’ कौस्तुभ बेलापुरकर संचालक, (म्युच्युअल फंड संशोधन),मोर्निंग स्टार

मध्यम मार्गी गुंतवणूकदारांसाठी बॅलंस फंडातील गुंतवणूक सुरक्षित
गुंतवणूकदारांनी जानेवारी ते डिसेंबर २०१४ या कालावधीत बाजार अपवाद वगळता केवळ एकच दिशेने वर गेला; परंतु जानेवारी ते ऑक्टोबर २०१५ या दहा महिन्यांचा विचार केल्यास बाजाराने अनेक मोठे चढउतार अनुभवले. हे चढ-उतारास करण ठरले ती काही देशांतर्गत करणे तर काही वेळेला जागतिक करणांनी बाजार दोलायमान अवस्थेत गेला. प्रत्येक गुंतवणूकदारांचे गुंतवणुकीचे उद्दिष्ट जोखीम सहन करण्याचे क्षमता व गुंतवणुकीचा कालावधी वेगवेगळा असल्याने योग्य म्युच्युअल फंडाची निवड करणे उचित असते.
अगदी दोन दिवसांनी जाहीर होणारा बिहार विधानसभेचा निकाल मग तो कसाही लागो बाजार मोठय़ा चढ-उताराला समोर जाणार आहे. पुढील १२ महिन्यांचा विचार केल्यास अमेरिकेत होऊ घातलेली व्याजदर कपात भारतातील उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आदी प्रमुख राज्यांच्या विधानसभा निवडणुका यांचा कमी अधिक परिणाम निर्देशांकांवर होणे अपेक्षित आहे. या गोष्टीचा कमी परिणाम होणारे फंड म्हणून जोखीम टाळण्याकडे कल असलेल्या गुंतवणूकदरांनी बॅलंस फंडात गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. आयसीआयसीआय प्रू. बॅलंस अ‍ॅडव्हाटेज फंडासारख्या योजनेमध्ये १० करमुक्त लाभांश मिळण्याचा पर्याय उपलब्ध आहे. बाजाराशी संलग्न जोखीम घेण्याची तयारी असणारया गुंतवणूकदरांनी या पर्यायाचा अवश्य विचार करावा.
’ रोमन सेठ, गुंतवणूक सल्लागार

दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी मिड कॅपला पसंती द्यावी
कुटुंबवत्सल चाकरमान्यांची अनेक स्वप्ने बोनसच्या भोवती एकवटलेली असतात. तरीही एखाद्या कर्तव्यदक्ष पित्याने दीर्घकालीन संपत्तीची निर्मितीच्या विचाराने किंवा लग्न व उच्च शिक्षण याच्या सारख्या मोठय़ा खर्चाच्या तरतुदीसाठी बोनसची गुंतवणूक केली तर ते सर्वस्वी चुकीचे म्हणता येणार नाही.
म्हणून बोनसची अर्धी रक्कम कुटुंबाच्या आवडी व इच्छांची पूर्ती करण्यात खर्च करावे. ज्यांत प्रामुख्याने एखादी इलेक्ट्रोनिक वस्तू किंवा दागिना याचा समावेश असेल.
हा खर्च केल्यानंतर उर्वरीत रक्कम म्युच्युअल फंड गुंतवणुकीद्वारा दीर्घकालीन भांडवलाच्या निर्मितीसाठी वापरावी. सध्याचा बाजाराचा कल पाहता ज्यांना हे पशाची गरज तीन वष्रे किंवा त्याहून कमी कालावधीत लागणार आहे त्यांनी हे पसे गुंतवणुकीत रोखे व समभाग यांचा समावेश असलेल्या बॅलंस फंडाचा विचार करावा.
गुंतवणुकीचा कालावधी तीन वर्षांहून अधिक असल्यास समभागांत गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडाच्या योजनांचा विचार करावा. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी आपल्या गरजा जाणून घेणारा गुंतवणूक सल्लागार (आयएफए) निवडणे जरुरीचे आहे.
गुंतवणूक सल्लागार मान:शात्रीय चाचण्यांच्या आधारे गुंतवणूकदाराची जोखीम सहन करण्याची क्षमता तपासून गुंतवणूकदाराच्या गरजा व जोखीम सहन करण्याची क्षमते यांची सांगड घालुन म्युच्युअल फंडाच्या योजनांतून योग्य त्या योजनांची शिफारस करेल.
ज्या गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचा कालावधी पाच वर्षांहून अधिक आहे व जे अधिक जोखीम घेऊन अधिक परतावा मिळवू इच्छितात अशा गुंतवणूकदारांनी आमच्या ‘एडलवाईज इमìजग लीडर्स फंड’ या मिडकॅप समभागांत गुंतवणूक करणारया फंडाचा विचार करावा.
’ विकास सचदेवा , व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, एडलवाईज म्युच्युअल फंड