News Flash

सेन्सेक्स २९ हजार; तर निफ्टी ८,८०० खाली

सेन्सेक्सने २९ हजार तर निफ्टीने ८,८०० खालील कामगिरी बजावत संसदेच्या यंदाच्या अर्थसंकल्प अधिवेशनाला नकारात्मक सलामी दिली.

| February 24, 2015 07:33 am

सेन्सेक्सने २९ हजार तर निफ्टीने ८,८०० खालील कामगिरी बजावत संसदेच्या यंदाच्या अर्थसंकल्प अधिवेशनाला नकारात्मक सलामी दिली.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सप्ताहरंभी २५६.३० अंश घसरणीने २८,९७५.९६ वर निफ्टी ७८.६५ अंश आपटीने ८,७५४.९५ पर्यंत घसरला.
आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी नफेखोरी साधत गुंतवणूकदारांनी भांडवली बाजाराच्या व्यासपीठावर येत्या शनिवारच्या अर्थसंकल्पाबाबत चिंताही व्यक्त केली.
कागदपत्रे चोरीच्या चर्चेत असलेल्या तेल व वायू क्षेत्र तसेच व्याजदर कपातीशी संबंधिक ग्राहकपयोगी वस्तू, बँक, स्थावर मालमत्ता, वाहन क्षेत्रातील समभागांची जोरदार विक्री झाली.
महिन्यातील शेवटच्या आठवडय़ाची सुरुवात करणारा मुंबई निर्देशांक सुरुवातीच्या टप्प्यात २९,३६२.९६ पर्यंत उंचावला होता. तर व्यवहार अंतापर्यंत घसरत चाललेल्या सेन्सेक्सने २८,९१३.१६ हा दिवसाचा तळ राखला.
व्यवहारअखेर सेन्सेक्समधील रिलायन्स, एचडीएफसी, ओएनजीसी, हिंदुस्थान यूनिलिव्हर, अ‍ॅक्सिस बँक, टाटा स्टील, बजाज ऑटो, आयटीसी, स्टेट बँक, इन्फोसिस, भारती एअरटेल, गेल, सिप्ला, हिंदाल्को, टाटा पॉवर, टाटा स्टील, सन फार्मा, टाटा मोटर्स, भेल असे आघाडीचे व मोठय़ा संख्येतील समभागांचे मूल्य रोडावले होते.
सोमवारी मुंबई शेअर बाजारात सर्वच क्षेत्रीय निर्देशांक जवळपास दोन टक्क्य़ांपर्यंत घसरले होते. तेल व वायू क्षेत्रातील रिलायन्स इंडस्ट्रीज तर २.५३ टक्क्य़ांनी घसरला. तर गेलमध्येही २.२२ टक्के घसरण नोंदली गेली. सेन्सेक्समधील केवळ सहा समभागांनाच अधिक मूल्य प्राप्त झाले.
शुक्रवारी मुंबई निर्देशांक २९,२३१.४१ वर बंद झाला होता. गेल्या आठवडय़ातील शेवटच्या व्यवहारातही सेन्सेक्सने २३० अंशांचे नुकसान नोंदविले होते. चालू आठवडय़ातही बाजारात अस्थिरतेचे व्यवहार होण्याची भीती गुंतवणूकदारांनी व्यक्त केली आहे. येत्या शनिवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. एका अंदाजानुसार, निफ्टीचा प्रवास या दरम्यान ८,५०० ते ८,९५० राहण्याची शक्यता आहे.
मोदी सरकारचा हा पहिला परिपूर्ण अर्थसंकल्प असेल. यादिवशी शनिवार असला तरी भांडवली बाजारातील व्यवहार नियमित वेळेत सुरू राहणार आहेत. तत्पूर्वी, शुक्रवारी आर्थिक पाहणी अहवाल तर गुरुवारी केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्प संसदेत सादर केला जाणार आहे.
बाजारात सोमवारी तेल व वाय क्षेत्रातील समभागांच्या मूल्य घसरणीवरही परिणाम झाला. केंद्रीय तेल मंत्रालयातील कागद चोरी प्रकरणात नावे आलेल्या दोन्ही रिलायन्ससह अन्य कंपन्यांचेही समभाग मूल्य बाजारात घसरले.
आशियाई बाजारातही संमिश्र चित्र राहिले. हाँगकाँग, दक्षिण कोरिया, जपानमधील प्रमुख निर्देशांक किरकोळ वाढले. तर इंडोनेशिया, सिंगापूर येथील प्रमुख निर्देशांकांमध्ये नाममात्र वाढ राहिली. चीन व तैवान येथीप प्रमुख भांडवली बाजार लुनार नववर्षनिमित्त बंद होते.
ग्रीसच्या वित्तीय सहकार्याच्या जोरावर युरोपीय बाजारातील प्रमुख निर्देशांकांमार्फत सोमवारीही उत्साह कायम होता. फ्रान्स, जर्मनीमधील निर्देशांकांमध्ये ०.४ टक्क्य़ांपर्यंत वाढ नोंदली गेली.
बाजारात सोमवारी गुंतवणूकदारांकडून नफेखोरीचाच अधिक प्रत्यय आला. आधीच्या सत्राच्या तुलनेत वरच्या टप्प्यावर समभागांची सत्रात खरेदी झाली. अर्थसंकल्पापूर्वी येत्या गुरुवारी महिन्यातील मासिक सौदापूर्तीच्या दिवशी अधिक दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे. येणाऱ्या अर्थसंकल्पात सरकारकडून पायाभूत सेवा क्षेत्रावर अधिक खर्चाची अपेक्षा आहे. तेव्हा निश्चितच संबंधिक समभागांवर परिणाम होईल.
– विनोद नायर, प्रमुख, मूलभूत संशोधन.

सुरुवातीच्या तेजीनंतर बाजारात दिवसअखेर घसरण नोंदली गेलेली सोमवारी पहायला मिळाली. वायदापूर्तीची नफेखोरी झाली, असेही याबाबत म्हणता येईल. औषध निर्मिती, माहिती तंत्रज्ञानसारख्या क्षेत्रात समभागांनी एकूण घसरत्या बाजारातही नफेखोरी अवलंबिली.
– अलेक्स मॅथ्यूज, प्रमुख संशोधक.
(उभय तज्ज्ञ ‘जिओजित बीएनपी पारिबास फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेस’मध्ये आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2015 7:33 am

Web Title: sp outlook on india triggers sensex fall nifty slips below 8800
टॅग : Arthsatta,Commerce,Nifty
Next Stories
1 म्युच्युअल फंडांना निवृत्त योजना विकण्याची मुभा मिळावी
2 रूपी बँक खातेदारांचा अन्नत्याग!
3 बँक कर्मचाऱ्यांना पगारवाढ
Just Now!
X