गुंतवणूकदारांचे सुमारे ५,६०० कोटी रुपये थकलेल्या नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लि. (एनएसईएल) घोटाळ्यातील, सर्वात मोठय़ा थकबाकीदार कंपन्या आणि त्यांच्या सहयोगी संस्थांच्या १२६ कोटी रुपये मूल्याच्या मालमत्तांवर जप्तीचे आदेश येथील विशेष न्यायालयाने बुधवारी दिले.
येथील विशेष अँटी-मनीलाँडरिंग न्यायालयाने, अंमलबजावणी संचालनालयाने या प्रकरणी सादर केलेल्या तपास अहवालाचा आढावा घेतला आणि मोहन इंडिया प्रा. लि. ही सर्वात मोठी थकबाकीदार कंपनी आणि तिच्याशी संलग्न अधिकाऱ्यांच्या स्थावर व जंगम मालमत्तांवर जप्तीचे आदेश दिले. गेल्या वर्षी अंमलबजावणी संचालनालयाने या मालमत्ता कायद्यान्वये गोठवण्याच्या आदेश दिले होते. न्यायालयाने त्या आदेशाला न्यायसंगत ठरवीत, त्या मालमत्ता जप्त करण्याचे फर्मान काढले आहे.
एनएसईएल या वस्तू बाजारमंचावर व्यवहार करणाऱ्या मोहन इंडियाने या घोटाळ्यातील प्रारंभिक तपशिलानुसार ९२२ कोटी रुपये थकविले होते. साखरेच्या कथित विक्रीच्या सौद्यासाठी ही रक्कम एनएसईएलने या कंपनीकडे हस्तांतरित केली होती, प्रत्यक्षात गोदामात साखरच नव्हती आणि सहभागी गुंतवणूकदारांचा सौदा पूर्ण होऊ शकला नाही. ताज्या आकडेवारीनुसार मोहन इंडियाचे दायित्व ६००.०८ कोटी रुपये असल्याचे दिसून येत आहे. यापैकी तिने बाजारमंचाला अवघे ५२.८५ कोटी रुपये आजवर चुकते केल्याचे आढळून येते. ‘‘शेतकरी व उत्पादकांना शेतमालाचे उचित भाव मिळवून देण्यासाठी असलेल्या एनएसईएल या बाजारमंचाचा मोहन इंडियाने गैरवापर केल्याचे स्पष्टच असून, अशी बेइमानी करून कमावलेल्या संपत्तीवर जप्ती आणणे न्यायोचितच ठरेल,’’ अशा शब्दांत काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये (पीएमएलए) कारवाईचा निर्णयाधिकार असलेल्या न्यायालयाचे के. राममूर्ती यांनी आपला निर्णय दिला.
एनएसईएलचे उच्चपदस्थ आणि तिच्या गोदाम व व्यवसाय विकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थकबाकीदार सदस्यांना आणि विशेषत: मोहन इंडिया समूहाला आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी कायम सहयोग व प्रोत्साहन दिले हे दुर्दैवी असल्याचेही न्यायालयाने नमूद केले. या सर्व मंडळींवरही न्यायप्रक्रिया चालवून त्यांना कायद्यान्वये कमाल शिक्षेसाठी पात्र ठरविले जावे, असेही न्यायालयाने शेरा दिला. शिवाय या सर्वाच्या जप्त मालमत्ता निकाली काढून तो पैसा त्रस्त गुंतवणूकदारांना परत केला जावा, असेही न्यायालयाने सूचित केले.

घोटाळेबाजांच्या जप्त मालमत्ता
* आलिशान टोयोटा फॉच्र्युनर मोटार, तीन रेंज रोव्हर्स मोटारी
* लखनऊ येथील गोमती एन्क्लेव्हस्थित तसेच मुंबईतील बोरिवली येथील आलिशान सदनिका
* दिल्लीतील मेहरौली, हौज खास, जोर बाग आणि सैनिक फाम्र्स या मोक्याच्या ठिकाणांवरील महागडे भूखंड, हरयाणाच्या कर्नाल येथील आठ भूखंड.
* एनएसईएल घोटाळ्याचा तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा आणि प्राप्तिकर विभागासह, अंमलबजावणी संचालनालय करीत असून, त्यांनी अन्य थकबाकीदार आणि त्यांच्या सहयोगींनी या ‘घोटाळ्यातून केलेली कमाई’ हेरून ती जप्त करण्याचे फर्मान दिले आहे.