खाद्यपदार्थ विक्री शृंखलेवर ३०० कोटी मोबदल्यात ताबा

कोलकाता : भाज्या, फळे, धान्य आदी खाद्यपदार्थ विक्री दालन साखळी असलेली गोदरेज समूहातील नेचर्स बास्केट ही नाममुद्रा आता याच क्षेत्रातील आघाडीच्या स्पेन्सर्स रिटेलकडे आली आहे. आरपी संजीव गोयंका समूहाने नेचर्स बास्केटमधील १०० टक्के भागभांडवली हिस्सा ३०० कोटी रुपयांच्या मोबदल्यात खरेदी केल्याचे शुक्रवारी जाहीर केले.

आरपी संजीव गोयंका समूहाचे मार्च २०१९ अखेरच्या वित्त वर्षांचे २.३९ कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्याचे निष्कर्षही या प्रसंगी जाहीर झाले. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत तोटय़ात असलेल्या समूहाने नफा नोंदविण्यासह हा संपादन व्यवहारही केला  आहे.

स्पेन्सर्सची देशातील विविध ३९ शहरांमध्ये १५६ किराणा दालने आहेत. नेचर्स बास्केटच्या अधिग्रहणामुळे आणखी ३६ दालनांची भर पडणार आहे आणि विशेषत: पश्चिम व दक्षिण भारतात शिरकाव करता येईल, असा विश्वास या व्यवहारासंबंधी घोषणेनंतर समूहाच्या किरकोळ व्यवसाय विभागाचे प्रमुख शाश्वत गोयंका यांनी व्यक्त केला.

आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये स्पेन्सर्स रिटेलने २,२१५ कोटी रुपये अशी दुप्पट विक्री नोंदविली आहे, तर नेचर्स बास्केटची याच कालावधीतील विक्री ३३८ कोटी रुपयांची आहे. नेचर्स बास्केटने मार्च २०१८ अखेरच्या वर्षांत ६२ कोटी रुपयांचा तोटा सहन केला होता. गोदरेज समूहातील गोदरेज इंडस्ट्रीजमार्फत नेचर्स बास्केटची दालने २००५ मध्ये सुरू करण्यात आली. शुक्रवारअखेर दोन्ही कंपन्यांचे समभाग मूल्य भांडवली बाजारात वाढले.

किरकोळ विक्री बाजारपेठेत सध्या फ्युचर रिटेलचे फूडहॉल-बिग बझार-मोअर, रिलायन्सचे फ्रेश यांचे अस्तित्व आहे, तर ऑनलाइनमध्ये अलिबाबाच्या बिग बास्केट, फ्लिपकार्टच्या सुपरमार्टमार्फत किराणा, भाज्या तसेच फळांची विक्री होते.