१,०१० रुपयांत ‘स्पाइसजेट’चे विमानाचे तिकीट
मुंबई: व्यवसायाच्या दशकपूर्तीनिमित्ताने स्पाइसजेटने १,०१० रुपयांमध्ये हवाई प्रवास उपलब्ध करून दिला आहे. २१ मेपर्यंतच असलेल्या या सवलत योजनेनुसार प्रवाशांना १ जुलै ते १५ ऑक्टोबपर्यंतच्या प्रवासासाठी या दोन दिवसांत नोंदणी करावी लागेल. कंपनीच्या विमानामार्फत देशांतर्गत प्रवासासाठी ही सवलत आहे. प्रथम तिकिटे घेणाऱ्यांना या योजनेसाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचे स्पाईसजेटने स्पष्ट केले आहे. जुलै ते ऑक्टोबर हा कालावधी हवाई कंपन्यांच्या दृष्टिकोनातून फारसा प्रतिसादात्मक नसतो. म्हणूनच कंपनीने १,००० रुपयातील ही तिकीट नोंदणी योजना जारी केली आहे. स्पाइसजेटनंतर अन्य कंपन्याही या सूट-सवलतीच्या स्पर्धेत उतरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

थेट विदेशी गुंतवणूक : रिझव्‍‌र्ह बँकेच्या परवानगीची आवश्यकता नाही?
नवी दिल्ली: थेट विदेशी गुंतवणुकीसाठी आवश्यक असलेली रिझव्‍‌र्ह बँकेची परवानगी यापुढे शिथिल करण्याच्या विचारात सरकार आहे. संसदेत नुकत्याच पारित झालेल्या वित्त विधेयकातील सुधारणेमुळे हे शक्य होणार आहे.
भारतातील व्यवसाय सुरळीत होऊन परकी चलन गंगाजळी वाढण्याच्या हेतूसाठी सरकार असे बदल करण्यास तयार झाल्याचे कळते. भारतातील सुलभ व्यावसायिक वातावरणावरून उद्योग जगताने सरकारवर वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे.
प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष थेट विदेशी गुंतवणुकीसाठी सध्या सरकार पातळीवर विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ व रिझव्‍‌र्ह बँकेची परवानगी आवश्यक ठरते.
संसदेत या महिन्याच्या सुरुवातीलाच सादर करण्यात आलेल्या वित्त विधेयक सुधारणा विधेयकाच्या विदेशी चलन व्यवस्थापन कायद्याच्या कलम ६ अंतर्गत असा बदल करता येणार आहे. यानुसार यापुढे भारतातील एखाद्या क्षेत्र, कंपनीमध्ये थेट विदेशी गुंतवणूक मर्यादा वाढीसाठी रिझव्‍‌र्ह बँकेच्या अनिवार्यतेची गरज भासणार नाही. मात्र विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची परवानगी पूर्वीप्रमाणेच आवश्यक ठरणार आहे. ३,००० कोटी रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीसाठी अशी परवानगी आवश्यक ठरते. यापुढील रकमेच्या विदेशी गुंतवणुकीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची परवानगी घ्यावी लागते.

शहरात ई-लॉबी, ग्रामीण भागात बँकांच्या ई-हट्स
मुंबई : ग्रामीण भागातील जनतेशी संपर्काचा दुवा म्हणून त्या ठिकाणी पाश्चिमात्य राष्ट्रात राबविली गेलेली ‘ई-हट्स’ची संकल्पना राबविण्याचा निर्णय आयडीबीआय बँकेने घेतला आहे. शहरी भागात बँकेने राबविलेल्या ई-लॉबींचा हा ग्रामीण अवतार असेल. कोणत्याही कर्मचाऱ्याविना, ग्राहकांना स्वत:हून तंत्रज्ञानाधारित उपकरणांच्या बँकेच्या विविध सेवांविषयी माहिती व लाभ मिळविता येईल, असा संकल्पनेमागील उद्देश आहे. मोठय़ा लोकसंख्या असलेल्या ग्रामीण क्षेत्रात या ई-राहुटय़ा बँकेकडून उभारल्या जाणार आहेत.

जी. पी. पारसिक बँकेची उलवे शाखा कार्यान्वित
प्रतिनिधी, ठाणे : गोपीनाथ पाटील पारसिक जनता सहकारी बँक लिमिटेडची उलवा शाखा अलीकडेच कार्यान्वित करण्यात आली. बँकेचे अध्यक्ष रणजीत पाटील यांच्या हस्ते शाखेच्या कामकाजाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. उपाध्यक्ष नारायण गावंड, संचालक डी. डी. घरत, अ‍ॅड्. पी. सी. पाटील, नामदेव पाटील, गोपीनाथ पाटील, रवींद्र पाटील, राजश्री पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सदानंद नायक, सरव्यवस्थापक शरद माडीवाले, एपीएमसीचे सभापती राजेंद्र पाटील, कर्नाळा स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीचे उपाध्यक्ष रवी पाटील याप्रसंगी उपस्थित होते.

स्नॅपडीलवर आता ‘व्हेस्पा’चे विशेष दालन
नवी दिल्ली : पिआज्जिओ कंपनीची प्रीमियम श्रेणीतील गीअरलेस स्कूटर व्हेस्पा आता ई-कॉमर्स व्यासपीठावरही उपलब्ध झाली आहे. या क्षेत्रातील आघाडीच्या स्नॅपडीलवर पिआज्जिओने थेट ऑनलाइन दालनच सुरू केले आहे. भारतातील अशाप्रकारचे हे पहिलेच वाहनविक्री दालन आहे. व्हेस्पाच्या व्हीएक्स, एस, एलिजेन्ट आदी दुचाकी येथे उपलब्ध असून एका क्लिकद्वारे ५,००० रुपये नोंदणी रक्कम भरून त्या प्राप्त करण्याची सुविधा आहे.

किसान मोल्डिंगच्या नव्या मुख्याधिकाऱ्यांकडून १००० कोटींच्या वृद्धीचे लक्ष्य
मुंबई: पॉलिमर पाइप्सच्या निर्मितीतील अग्रेसर किसान मोल्डिंग लिमिटेडने तिचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी अभय शंकर यांच्या नेतृत्वात आगामी तीन वर्षांत दुपटीने वाढीचे लक्ष्य राखणारी महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तारापूरस्थित एक्स्ट्रजन विभागाच्या आधुनिकीकरणासाठी ६ कोटींची गुंतवणूकही केली जाणार असून हा प्रकल्प २०१५च्या अखेपर्यंत पूर्ण होईल. योग्य तिथे गुंतवणूक, उत्पादन क्षमतेचा उच्चतम वापर, उत्पादन नावीन्य आणि आक्रमक विपणन व वितरण डावपेच या चतु:सूत्रीतून तीन वर्षांचा वृद्धी आलेख त्यांनी आखला आहे. शेतीसाठी वापरात येणाऱ्या पॉलिमर पाइप्सची देशात १८,००० कोटींची बाजारपेठ असून, २०१८ पर्यंत त्यापैकी १० टक्के हिस्सा म्हणजे १,००० कोटींच्या उलाढालीची कंपनी बनण्याचा मानस शंकर यांनी व्यक्त केला.