काही दिवसांपूर्वी दीड हजारात विमान तिकीट उपलब्ध करून देत भारतीय प्रवासी विमानोड्डाणात दरयुद्धाची सुरुवात करणाऱ्या स्पाइसजेटने आता रेल्वेपेक्षाही स्वस्त हवाई सफर उपलब्ध करून दिली आहे. नव्या मोहिमेसाठी या कंपनीने ५९९ रुपयांमध्ये देशांतर्गत, तर ३,४९९ रुपयांमध्ये आंतरराष्ट्रीय विमान प्रवास देऊ केला आहे.

११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान येत्या १ जुलै ते तब्बल २४ आक्टोबपर्यंत हवाई सफर नोंदणी करणाऱ्यांसाठी ही दर सवलत देण्यात येणार आहे. यासाठी चार लाख आसने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
५९९ रुपयांमध्ये देशांतर्गत विमान प्रवासासाठी एक लाख आसने उपलब्ध केली जाणार आहेत. हैदराबाद ते विजयवाडा, दिल्ली ते देहरादून, गुवाहाटी ते कोलकत्ता, अहमदाबाद ते मुंबई, बंगळुरू ते हैदराबाद आदी निवडक ठिकाणांसाठी हे दर असतील. सध्या या टप्प्यासाठी २,५०० रुपयांपुढे भाडे लागते.
३,४९९ रुपयांत उपलब्ध असलेल्या आंतरराष्ट्रीय हवाई सफरीसाठी कोलंबो, काबूल आणि दुबईव्यतिरिक्त अन्य देशांचा समावेश असेल. यासाठी तीन लाख आसने उपलब्ध आहेत. दिल्ली ते काठमांडू तसेच अन्य निवडक आंतरराष्ट्रीय उड्डाणे या सवलतीच्या दरांमध्ये उपलब्ध आहेत. नियमित दरांपेक्षा यंदा निश्चित लेल्या तिकीट दरांमध्ये सवलतीचे प्रमाण तब्बल ७५ टक्के आहे.
कंपनीने जाहीर केलेला स्वस्त दरातील हवाई प्रवास कालावधी हा तुलनेत कमी मागणी आणि गर्दी नसणारा आहे; तेव्हा या कालावधीत रिकामी आसने राहण्यापेक्षा किमान दरांमध्ये प्रवास उपलब्ध करून देणे आम्ही आवश्यक समजतो, असे स्पाइसजेटने जारी केलेल्या पत्रकात मुख्य परिचलन अधिकारी संजीव कपूर यांनी म्हटले आहे.
हवाई महासंचलनालयाद्वारे आगाऊ तिकीट नोंदणी र्निबध हटल्यानंतर स्पाइसजेटची माफक दरातील ही चौथी तिकीट फैरी आहे.

अधिकाधिक भारतीयांना हवाई प्रवासाची संधी मिळावी यासाठी ‘रेल्वेपेक्षाही स्वस्त’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. रेल्वेमधील वातानुकूलित दर्जाच्या प्रवासापेक्षा निश्चितच हे दर कमी आहेत. अनेक मार्गावर ते रेल्वेच्या बिगरवातानुकूलित शयनयान प्रकारच्या प्रवासाच्या तुलनेतही स्वस्त आहेत.
कानेश्वरन अविली, मुख्य वाणिज्य अधिकारी, स्पाइसजेट