भारतातील चहाच्या उद्योगाला प्रोत्साहनासाठी आयोजित होणारा एकमेव आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा अर्थात ‘वर्ल्ड टी अ‍ॅण्ड कॉफी एक्स्पो’मध्ये सलग दुसऱ्या वर्षी श्रीलंकेचे सर्वात मोठे प्रतिनिधित्व होऊ घातले आहे. यंदा या व्यापार मेळ्याची ही चौथी आवृत्ती २० ते २२ ऑक्टोबर २०१६ दरम्यान योजण्यात आली आहे.
श्रीलंकेतील चहा व्यापाराच्या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांसमवेत तेथील टी बोर्डाचे विशेष दालन यंदाच्या प्रदर्शनात असेल. श्रीलंकेत चहाप्रेमी भरपूर असून, तेथील विशेष चहा उत्पादने, ब्रँड्स आणि चवींची ओळख या निमित्ताने भारतीयांना होईल. केवळ खरेदीकर्तेच नव्हे, तर भारतात संयुक्त भागीदारीच्या संधी आणि वितरकांचाही शोध या निमित्ताने घेतला जाईल, असे श्रीलंका टी बोर्डाचे अध्यक्ष रोहन पेथीयागोडा यांनी सांगितले. देशांतर्गत वापर वगळता श्रीलंकेतून ९० टक्के चहा उत्पादन निर्यात होते आणि त्या देशाच्या निर्यात व्यापाराचा महत्त्वाचा हिस्सा ते व्यापते, असे त्यांनी सांगितले.