11 August 2020

News Flash

कर्मचारी कपात म्हणजे कंपनी नेतृत्वात सहानुभूतीचा अभाव – टाटा

नफ्याचा पाठलाग आपण करतोच. मात्र या दरम्यानचा प्रवास किती नैतिक असतो, हे तपासायला हवे

संग्रहित छायाचित्र

 

करोना-टाळेबंदीचे निमित्त साधून कंपन्यांमध्ये सुरू असलेली हजारोंच्या संख्येतील कर्मचारी कपात म्हणजे असा निर्णय घेणाऱ्या कंपन्यांच्या वरिष्ठांमध्ये सहानुभूतीचा अभाव असल्याची टीका टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी केली आहे.

आस्थापनांची यशस्वी नेतृत्वगाथा प्रसारित करणाऱ्या यूअरस्टोरी या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत टाटा यांनी देशातील कंपनी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांप्रतिच्या व्यवस्थापन वर्तणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली.

जे लोक तुमच्यासाठी अहोरात्र काम करतात. जे आपली कारकीर्द कंपन्यांच्या सेवेसाठी घालवितात. त्यांना तुम्ही अशी वागणूक देता! नैतिकतेची तुमची नेमकी व्याख्या तरी काय आहे? अशा तीव्र शब्दात टाटा यांनी कोविड काळात सुरू असलेल्या कंपन्यांच्या मनुष्यबळ विकास धोरणाबाबत नापसंती व्यक्त केली.

करोना आणि त्यामुळे आलेल्या टाळेबंदीमुळे अनेक कंपन्यांनी होणारे नुकसान लक्षात घेऊन कर्मचारी तसेच वेतन कपात लागू केली आहे. टाटा समूहानेही २० टक्के  वेतन कपात लागू केली असली तरी अद्याप कर्मचारी कपात केलेली नाही. समूहातील आदरातिथ्य, वाहतूक, वित्त तसेच वाहन निर्मिती व्यवसायाला आर्थिक फटका बसला आहे. समूहातील अनेक सूचिबद्ध कंपन्यांचे जून २०२० अखेरचे तिमाहीत वित्तीय निष्कर्ष घसरत्या नफ्याचे जाहीर झाले आहेत.

कंपनी आणि व्यवस्थापनाबाबत टाटा म्हणाले की, कर्मचाऱ्यांप्रति तुम्ही संवेदनशील नसाल तर तुम्ही एक आस्थापनाचालक म्हणून दीर्घकाळ राहू शकत नाही. करोना वा अन्य काहीही कारणामुळे तुम्हाला भलेही नुकसान होवो. मात्र तुम्ही कर्मचाऱ्यांसाठी कायमच भलेपण जपायला हवे, असेही टाटा यांनी सूचित केले.

नफ्याचा पाठलाग आपण करतोच. मात्र या दरम्यानचा प्रवास किती नैतिक असतो, हे तपासायला हवे. फक्त पैसा कमविणे हे व्यवसायाचे उद्दिष्ट असता कामा नये. ग्राहक, भागधारक यांच्यासाठी कं पनीतील वरिष्ठांनी योग्य आणि नैतिकतेने निर्णय घेतले पाहिजेत. व्यवसायात चुका होतातच. मात्र प्रत्येक वळणावर ती दुरुस्त करणे आणि कठीण प्रसंगात पळ न काढणे हेही महत्त्वाचे आहे.

– रतन टाटा, मानद अध्यक्ष, टाटा समूह.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2020 12:18 am

Web Title: staff cuts mean lack of sympathy in company leadership tata abn 97
Next Stories
1 बाजार-साप्ताहिकी : षटकार!
2 अ‍ॅपलचा चीनला मोठा झटका; आणखी एका स्मार्टफोनच्या उत्पादनाला भारतात सुरुवात
3 बँकांपाठोपाठ, विमा, नाबार्ड, रिझव्‍‌र्ह बँक कर्मचाऱ्यांनाही भरीव वेतनवाढीची आस
Just Now!
X