News Flash

मानांकन उंचावले!

‘स्टँडर्ड अ‍ॅण्ड पूअर्स’ (एस अ‍ॅण्ड पी) या आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने भारताचे पतमानांकन ‘नकारात्मक’ स्थितीतून ‘स्थिर’ अशा टप्प्यावर आणून ठेवले.

| September 27, 2014 04:51 am

केंद्रात सत्तेवर आलेल्या नव्या सरकारमध्ये सुधारणा राबविण्याची क्षमता असून ते अर्थव्यवस्थेला पुन्हा विकासाच्या मार्गावर नेईल, असे मत व्यक्त करीत ‘स्टँडर्ड अ‍ॅण्ड पूअर्स’ (एस अ‍ॅण्ड पी) या आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने भारताचे पतमानांकन ‘नकारात्मक’ स्थितीतून ‘स्थिर’ अशा टप्प्यावर आणून ठेवले. चालू वर्षअखेर वित्तीय, विदेशी तूट कमी होऊन महागाई दर कमी झाल्यास तसेच विकासाचा दर पुन्हा ५.५ टक्क्यांपर्यंत गेल्यास देशाचे पतमानांकन आणखी उंचावले जाईल, असेही संस्थेने नमूद केले आहे.
‘एस अ‍ॅण्ड पी’ने भारताचे पतमानांकन ‘बीबीबी-/ए-३’ केले आहे. त्याचबरोबर दीर्घकालीन मानांकन उणेतून स्थिर अशा टप्प्यावर आणून ठेवले आहे. २०१२ मध्ये याच संस्थेमार्फत पतमानांकन स्थिरवरून उणे करण्यात आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यासाठी भारताबाहेर जाताच ‘एस अ‍ॅण्ड पी’ने पतमानांकनात सुधार केला आहे. पंतप्रधानांनी गुरवारीच ‘मेक इन इंडिया’ या निर्मितीपूरक वातावरण बदलाच्या योजनेचा शुभारंभ केला होता. ‘एस अ‍ॅण्ड पीे’च्या निर्णयामुळे देशाविषयीचा विदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अन्य पतमानांकन संस्थाही नजीकच्या कालावधीत आपल्या धोरणात बदल करण्याची शक्यता आहे.
केंद्रातील स्थिर व नवे सरकार विकासाला चालना देणाऱ्या सुधारणा राबविण्यास सक्षम ठरेल असे मत व्यक्त करतानाच याचे चित्र वित्तीय बदलांमध्येही होईल, असा विश्वासही पतसंस्थेने व्यक्त केला आहे. स्थिर पतमानांकनामुळे तूर्त पतमानांकन कमी होण्याची जोखीम टळली आहे, असेही नमूद करतानाच सुधारित पतमानांकन हे येत्या दोन वर्षांसाठी आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. हा बदल आमचा सरकारविषयक दृष्टिकोन परावर्तित करेल, असा विश्वासही यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला आहे.
विकास दरासह गेल्या काही कालावधीत गमावलेल्या वित्तीय जमेच्या बाबी पूर्वपदावर आणण्यास हे पतमानांकन सरकारला सहकारक ठरेल तसेच रिझव्‍‌र्ह बँकेलाही परिणामकारक पतधोरण सादर करण्यास कारणीभूत ठरेल, असे ‘एस अ‍ॅण्ड पी’ने म्हटले आहे. सरकारचा सुधारणेविषयीचा आराखडा अर्थव्यवस्थेला वेग देण्यात अपयशी ठरला तर पतमानांकन कमी केले जाऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.
विदेशी निधीबाबत भारताची स्थिती समाधानकारक असल्याचे नमूद करत यात भारताचे स्थान बलाढय़ असून विदेशी कर्जाचे प्रमाणही कमी असल्याचे ‘एस अ‍ॅण्ड पी’ने नमूद केले आहे. मार्च २०१५ अखेर चालू खात्यातील मिळकतीच्या प्रमाणात देशाचे विदेशी कर्ज हे ६ टक्के राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. २०१८ पर्यंत सरकारचे सर्वसाधारण निव्वळ कर्ज सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत ६० टक्क्यांखाली येईल, असे नमूद करतानाच सरकारची सर्वसाधारण निव्वळ मिळकत केवळ २० टक्क्यांच्या खाली राहील, असेही पतमानांकन संस्थेने म्हटले आहे. याचबरोबर पतमानांकन संस्थेने येत्या वर्षांत देशाचा दरडोई विकास दर ५ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. मार्च २०१४ अखेर चालू खात्यावरील तूट सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या १.८ टक्के राहील, असेही संस्थेला वाटते.

एप्रिल २०१२ मध्ये तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारला जडलेला धोरण-लकवा आणि भ्रष्टाचाराची एका मागोमाग एक पुढे आलेल्या प्रकरणांच्या धबडग्यात, एस अ‍ॅण्ड पी ने भारताला ‘नकारात्मक’ पत बहाल केली होती, ज्याने अर्थव्यवस्थेविषयक गुंतवणूकदारांच्या ढासळत्या भावनेला प्रतिबिंबीत केले.
पतमानांकन उंचावणे म्हणजे अर्थव्यवस्था सुधार आणि गुंतवणूकपूरक वातावरण पुन्हा निर्माण केल्याची पावती आहे. यामुळे विकासाचे वर्तुळ पूर्ण होईल.
अरविंद मायाराम,केंद्रीय वित्त सचिव

फुगत चाललेली भारताची विदेशी गंगाजळी, भांडवली ओघ आणि चालू खात्यावरील तूट यावर प्रतिक्रिया देणारे हे पतमानांकन आहे. वित्तीय स्थितीबाबत अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने देश प्रगती करेल आणि आगामी कालावधीत अधिक सकारात्मक आश्चर्य प्रदान करेल, यावर आमचा विश्वास आहे.
अरुंधती भट्टाचार्य,स्टेट बँकेच्या अध्यक्षा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2014 4:51 am

Web Title: standard and poors upgrades outlook for india
Next Stories
1 उन्नत मानांकनाने उफाण!
2 ‘सेबी’ अधिकाऱ्याविरोधात ‘सीबीआय’कडून चौकशी
3 एअर एशिया इंडियाचे मुंबईतून उड्डाण लवकरच!
Just Now!
X