ब्रिटनमधील स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँकेने भांडवली बाजाराशी संबंधित दलाली व्यवसायच एका फटक्यात बंद करण्याचे जाहीर केले असून तिच्या किरकोळ बँकिंगमध्येही काटकसरीच्या उपाययोजनांमुळे सुमारे चार हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.
बँकेने गेल्या काही महिन्यांमध्ये आशियातील व्यवसायावर भर कमी करण्याचे घोषित केले. याचाच एक भाग म्हणून भांडवली बाजाराशी संबंधित तोटय़ातील व्यवसायातून अंग काढून घेण्याचे संकेत देण्यात आले होते. बँकेने गेल्या तिमाहीत दोन हजार कर्मचारी कमी केले होते.
लंडनमध्ये मुख्यालय असलेल्या या बँकेत सध्या ८६ हजार मनुष्यबळ आहे. ताज्या नोकरकपातीत मुख्य जोखीम अधिकारी रिचर्ड गोल्डिंग आणि मुख्य माहिती अधिकारी जॅन वरप्लॅन्के यांचा क्रमांक लागला आहे. भांडवली बाजार व्यवसायातून बँकेला गेल्या वर्षांत १० कोटी डॉलरचा महसूल मिळत होता. बँकेच्या या व्यवसायाशी संबंधित हाँगकाँग, सिंगापूर येथील कार्यालयांना गुरुवारीच टाळे लागलेले कर्मचाऱ्यांना दिसले.