कर्नाटकातील कुर्ग, उटी या कॉफीसाठी प्रसिद्ध असलेल्या भारतातील कॉफी समस्त देशांमध्ये पोहोचविण्याचा इरादा अमेरिकन कंपनी स्टारबक्सने जाहीर केला आहे. देशात पेय साखळी दालनांसाठी टाटा समूहाबरोबर भागीदारी असलेल्या या कंपनीने येथे उत्पादित कॉफी आपल्या जगभरातील १९,००० दालनांपर्यंत पोहोचविण्याचा विडा उचलला आहे. भारतातील विविध भागांतील मळ्यांमध्ये तयार झालेली कॉफी कंपनी केवळ देशातील दालनांमध्येच उपलब्ध करून देणार नाही तर ती कंपनीचे जगभरात जाळे असलेल्या १९ हजारांहून अधिक दालनांपर्यंत पोहोचवली जाईल, असे स्टारबक्स समूहाच्या चीन आणि आशिया पॅसिफिक विभागाचे (विकास व नाममुद्रा) अध्यक्ष जॉन कल्वर यांनी सांगितले. कंपनीने भारतातील टाटा समूहाबरोबर भागीदारी करत जानेवारी २०१३ पासून चहा विक्री साखळी दालनांचा शुभारंभ केला आहे. कंपनीचे दक्षिणेतील पहिले दालन बंगळुरात शुक्रवारी सुरू झाले. या वेळी टाटा स्टारबक्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अवनी दावडा याही उपस्थित होत्या. कंपनीची यापूर्वी दिल्ली, मुंबई आणि पुण्यात दालने आहेत. वर्षअखेर कंपनी बंगळुरात आणखी दोन दालने सुरू करेल.