पारंपरिक गांधीटोपीधारी डबेवाल्यांच्या पावलावर पाऊल ठेवून, त्यांनाच आव्हान देणारी दमदार मोटरसायकलची सवारी करीत आणि पत्ता शोधून काढणाऱ्या गुगल मॅपची साथ असलेल्या स्मार्ट राइडर्सची फौज बडय़ा शहरातून उभी राहताना दिसत आहे. मुंबई-पुण्यात ग्रॅब डॉट इन तर, देशात इतरत्र युअरगाय यासारख्या तरुणांकडून सुरू केलेल्या स्टार्टअप्स आता गरमागरम जेवण गरजूंना वेळेत पोहोचविण्यासाठी सरसावल्या आहेत.
मुंबई, पुण्यात पाय बऱ्यापैकी जमविलेली ग्रॅब ही तयार खाद्यान्न्ो ग्राहकांपर्यंत पोहचविण्याची अ‍ॅपद्वारे संचालित अनोख्या सेवेची संकल्पना आहे. अनेक उपाहारगृहांकडे त्यांचे खाद्यपदार्थ ग्राहकांना घरपोच पोहचविणारे यंत्रणा नाही. अशांना ग्रॅबसारख्या अल्पमोबदल्यात व सत्वर सेवा खूपच उपयुक्त ठरत असल्याचे आढळून येते. काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या बरोबरी दिसणाऱ्या रेडिओ टॅक्सी व कॅबसारखाच हा बदल असून, नेमक्या त्याच धर्तीवर बनविलेल्या ग्रॅबच्या मोबाइल अ‍ॅपमधून हे सेवा जाळे विविध उपाहारगृहे व फूड चेन्ससाठी कार्यरत झाले आहे, असे ग्रॅबचे सहसंस्थापक निशांत व्होरा यांनी सांगितले.
मुंबई-पुण्यात आजवर ८०० राइडर्सचा (खाद्यपदार्थ पोहचते करणारे गणवेषधारी बाइकस्वार) ताफा ग्रॅबने बनविला असून, ३५० हून अधिक आधुनिक उपाहारगृहातून दिवसाला येणाऱ्या ४,००० हून अधिक ग्राहकांची मागणीची पूर्तता त्यांच्याकडून केली जाते. जेवणाचे डबे पोहचविण्याची सेवा मात्र अलीकडेच सुरू झाली असून, हे डबे नोकरदारांच्या गृहिणीने बनविलेल्या जेवणाचे नाहीत, अशी पुस्तीही व्होरा यांनी जोडली. मुंबईत ग्रॅबने अलीकडेच अहमदाबाद या नव्या शहरात प्रवेश केला असून तेथे १० उपाहारगृहांसाठी ३०० राइडर्सद्वारे सेवेस सुरुवात केली आहे. ग्रॅबची सेवा उपभोगणाऱ्यांमध्ये सब-वे, मेनलँड चायना, स्मोकिन जोज, पंजाबी ग्रिल वगैरे बडय़ा व लोकप्रिय खाद्य शृंखलांचाही समावेश आहे. ग्रॅब डॉट इनसारख्या उन्नत व्यवसाय ढाच्याने साहस भांडवली गुंतवणूकदारांचेही लक्ष वेधून घेतले असून, अलीकडेच तिने ऑलिफन्स कॅपिटल व अन्य गुंतवणूकदारांकडून सुमारे ६.५ कोटींचे अर्थसाहाय्य मिळविले आहे.
बाजारात ‘फूड-टेक कंपन्यां’चा बोलबाला
देशाच्या खाद्यसेवा बाजाराचा व्याप हा तब्बल तीन लाख कोटी रुपयांच्या घरात जाणारा असून, वार्षिक १६ ते २० टक्के दराने तो वाढ करीत आहे. उल्लेखनीय म्हणजे गेल्या काही वर्षांत झोमॅटो आणि फूडपांडाच्या धर्तीवर आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नव्या तब्बल १७ फूडटेक स्टार्टअप्स स्मार्टफोनचा आसमंत व्यापून, ग्राहकांची भूक शमविण्यासाठी त्या सरसावल्या आहेत.