मुंबई : देशातील सर्वात मोठय़ा स्टेट बँकेने तिच्या एक ते १० वर्षे मुदतीच्या ठेवींवरील व्याजदरात ०.१५ टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. ही व्याजदर कपात १० जानेवारी २०२० पासूनच लागू करण्यात आली आहे. दोन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या ठेवींवर ती लागू होणार असल्याने याचा सर्वाधिक फटका सामान्य बचतदार आणि ज्येष्ठ नागरिकांनाच बसणार आहे.

एक वर्षांहून अधिक मात्र १० वर्षांपर्यंत मुदत असलेल्या ठेवींवर वार्षिक ६.२५ टक्क्यांच्या ऐवजी आता वार्षिक ६.१० टक्के व्याजदर लागू असेल. तर ज्येष्ठ नागरिकांना, याच रक्कम व मुदतीसाठी सध्या मिळत असलेल्या ६.७५ टक्क्यांऐवजी वार्षिक ६.६० टक्के व्याजदर लागू असेल. बँकेने ७ दिवस ते एक वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात मात्र कोणताही बदल केला नाही. सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने नोव्हेंबरमध्येच एक ते दोन वर्षे मुदतीच्या ठेवींवरील व्याजदरात ०.१५ टक्क्यांपर्यंत कपात लागू केली आहे.

युनियन बँकेकडून कर्ज व्याजदरात कपात

मुंबई : युनियन बँक ऑफ इंडियाने विविध कालावधीच्या कर्जावरील ‘मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स’ आधारित कर्ज व्याजदर (एमसीएलआर) ०.१० टक्क्य़ाने कमी केले आहेत. बँकेचा एक वर्षांचा एमसीएलआर आता ८.१० टक्के असेल. यापूर्वी तो वार्षिक ८.२० टक्के ह ोता. जुलै २०१९ पासून युनियन बँक ऑफ इंडियाने सलग सातव्यांदा व्याजदर कमी केले आहेत. अशाप्रकारे फेब्रुवारी २०१९ पासून विविध कालावधींसाठी एकत्रित दर कपात ०.६० ते ०.७५ टक्के आहे. बँकेचे सुधारित दर ११ जानेवारी २०२० पासून लागू झाले आहेत.