भागभांडवलाच्या आवश्यक त्या प्रमाणाची पूर्तता करण्याच्या उद्देशाने बँकिंग अग्रणी भारतीय स्टेट बँकेने आपल्या कर्मचाऱ्यांकडून योगदानाची अपेक्षा केली आहे. बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी कर्मचारीवर्गाला हक्कभाग विकून ८०० ते १२०० कोटी उभारण्याची योजना असल्याचे शुक्रवारी येथे सांगितले. स्टेट बँकेने सरकारला या बाबतीत आधीच पत्र लिहिले असून सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद अपेक्षित असल्याचे त्या म्हणाल्या. खासगी बँकांच्या पारंपरिक ‘इसॉप’ अर्थात कर्मचाऱ्यांना सवलतीत समभाग देऊन भागभांडवलाचे वाटेकरी बनविण्याच्या योजनेपेक्षा ही योजना वेगळी असल्याचे भट्टाचार्य यांनी नमूद केले. तथापि प्रत्येक श्रेणीतील आणि पदावरील सर्व कर्मचाऱ्यांना बँकेचे समभाग खरेदीसाठी खुले असतील. सरकारकडून मंजुरी मिळवून विक्री किंमत निश्चित केली जाईल.