आर्थिक समस्येत अडकलेल्या जेट एअरवेजमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची तब्बल 15 टक्के इतकी मालकी होऊ शकते असे वृत्त आहे. अर्थविषयक काही वृत्तवाहिन्यांच्या सांगण्यानुसार जेट एअरवेजनं आपल्या डोक्यावर असलेलं कर्ज कमी करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून कर्जाच्या बदल्यात कंपनीत शेअर्स देण्याचा प्रस्ताव दिला होता.

सध्याचं कर्ज शेअर्समध्ये रुपांतरीत करण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी भागधारकांची संमती घेण्याचे जेटनं म्हटलं होतं. नवीन भागधारकांना त्यांचे प्रतिनिधी संचालक मंडळावर नेमता येतील आणि सध्याच्या आर्थिक समस्येवर मात करता येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.

जेट एअरवेजमध्ये सध्या 24 टक्के हिस्सा असलेल्या इत्तिहाद एअरवेज आणखी गुंतवणूक करण्याची शक्यता असून त्यांचा हिस्सा 40 टक्के होईल आणि काही बँका त्यांचं कर्ज शेअर्समध्ये रुपांतरीत करतील व त्यांना 30 टक्के भागीदारी मिळेल असं वृत्त काही वाहिन्यांनी दिलं आहे. यामुळे भारतीय स्टेट बँकेचे कर्ज शेअर्समध्ये रुपांतरीत झाले तर ही सरकारी बँक जेटमध्ये 15 टक्के इतक्या हिश्शाची मालक होईल अशी शक्यता आहे.

जेट एअरवेजच्या डोक्यावर सुमारे 8,400 कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा असून यापैकी तब्बल दोन हजार कोटी रुपयांचं कर्ज एकट्या स्टेट बँकेचं आहे. जेटचे अध्यक्ष नरेश गोयल यांनी स्टेट बँकेला पत्र लिहून 700 कोटी रुपयांची गुंतवणूक कंपनीत करण्याची तयारी दर्शवली असून कंपनीमध्ये किमान 25 टक्के भागीदारी राखण्याची अट घातली होती.