नवी दिल्ली : देशाच्या बँकिंग क्षेत्रातील अनिष्पादित कर्ज मालमत्ता ताब्यात या समस्येचे निराकरण म्हणून यंदाच्या अर्थसंकल्पातून प्रस्तावित करण्यात आलेल्या ‘बॅड बँक’ अर्थात राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचना कंपनी लिमिटेडच्या (एनएआरसीएल) मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर स्टेट बँकेत मुख्य महाव्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले पद्माकुमार एम. नायर यांची वर्णी लागली आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयातील माहितगार सूत्रांनी ही माहिती मंगळवारी दिली.

देशातील सर्वात मोठ्या बँकेतील अनिष्पादित कर्ज मालमत्ता हाताळण्याच्या दीर्घ अनुभवाच्या निकषावरच नायर यांची निवड झाली असल्याचे सांगितले जाते. ही प्रस्तावित बॅड बँकेची रचना आणि घडणी ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील त्याचप्रमाणे खासगी क्षेत्रातील बँकांच्या एकत्र सहयोगातून केली जाईल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फेब्रुवारीतील अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले होते.