पाच सहयोगी व एक महिला बँक ताब्यात घेऊन मुख्य स्टेट बँकेला आर्थिकदृष्टय़ा अधिक फायदा होणार नाही, असे गणित मूडीजने मांडले आहे.
पाचपैकी भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या तीन सहयोगी बँकांच्या विद्यमान समभाग मूल्याच्या जोरावर स्टेट बँकेला १,६६० कोटी रुपयांचा खर्च होऊ शकतो, असे आंतरराष्ट्रीय वित्त विश्लेषक संस्थेने म्हटले आहे.
‘मूडीज इन्व्हेस्टर सव्‍‌र्हिस’ने जाहीर केलेल्या अहवालात, स्टेट बँकेचा यापूर्वीच तीन सहयोगी बँकांमध्ये जवळपास सर्वाधिक हिस्सा असून या विलीनीकरणातून स्टेट बँकेच्या पत गुणवत्तेवरही मर्यादित परिणाम होईल, असे नमूद करण्यात आले आहे.
सहयोगी बँका ताब्यात घेण्याचा व्यवहार स्टेट बँक ही अधिकतर रोखीनेच पूर्ण करण्याची शक्यता वर्तवत मूडीजने, भारतीय महिला बँकेच्या खात्यातील रक्कम ही स्टेट बँकेच्या एकूण मालमत्तेच्या ०.१ टक्केच असल्याकडेही अहवालाद्वारे लक्ष वेधले आहे. विलीनीकरणामुळे भौगोलिकदृष्टय़ा काही भागांमध्ये स्टेट बँकेच्या अंतर्गत शाखांची संख्या वाढणार असून या विलीनीकरणाला होत असलेला बँकेतील कर्मचाऱ्यांचा विरोध हे प्रक्रियेपुढील आव्हान असेल, असेही मूडीजने म्हटले आहे.
स्टेट बँक ऑफ बिकानेर अ‍ॅण्ड जयपूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ पटियाळा व स्टेट बँक ऑफ त्रावणकोर या पाच सहयोगी तसेच भारतीय महिला बँकेच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव स्टेट बँकेने सोमवारी केंद्र सरकारकडे पाठविला. स्टेट बँकेच्या पाचपैकी तीन सहयोगी बँका या बाजारात सूचिबद्ध आहे, तर स्टेट बँक ऑफ हैदराबाद आणि स्टेट बँक ऑफ पटियाळामध्ये स्टेट बँकेचा सर्वाधिक हिस्सा आहे.