स्टेट बँकेकडून सहा लाख डेबिट कार्ड ब्लॉक’ ; अ‍ॅक्सिस बँकेतील खात्यांची लक्षणीय माहिती हॅक

यंदाच्या दिवाळीत डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग याद्वारे खरेदीकरिता सज्ज झालेल्या ग्राहकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. बँकांच्या व्यवहारांवर विदेशातून हल्ला होत असल्याच्या वाढत्या प्रकारामुळे स्टेट बँकेला तिच्या सहा लाख डेबिट कार्डाद्वारे व्यवहार खंडित करावे लागले आहेत. तर अ‍ॅक्सिस बँकेने तिच्या ग्राहकांना इंटरनेट व्यवहार करताना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.

स्टेट बँकेचे काही डेबिट कार्ड हे बिगर स्टेट बँक एटीएममध्ये वापरल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. अशा तक्रारींची संख्या वाढल्याने बँकेची सहा लाखांहून अधिक कार्ड खंडित करण्याचा निर्णय स्टेट बँकेने घेतला असून सर्वच कार्डधारकांना ती बदलून देण्याची तयारी दाखविण्यात आली आहे. यासाठी बँकेच्या ग्राहकांना प्रत्यक्ष शाखा, फोन बँकिंग, इंटरनेट बँकिंग आदी पर्यायाद्वारे संपर्क साधता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

या घटनेमुळे स्टेट बँकेने सहा लाख डेबिट कार्ड ‘ब्लॉक’ केले असून ते बदलून देण्याची तयारी दाखविली आहे. बँकिंग क्षेत्रातील ही विक्रमी कार्ड बदल मोहीम मानली जाते.

स्टेट बँकेच्या ग्राहकांना नवीन कार्ड मिळण्यास आणखी १० ते १२ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. आठवडय़ावर आलेल्या दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर यामुळे स्टेट बँक कार्डधारकांच्या खरेदी उत्साहावर यामुळे विरजण पडले आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, जुलै २०१६ अखेर स्टेट बँकेची २०.२७ कोटी कार्यरत डेबिट कार्ड आहेत. तर स्टेट बँकेच्या पाच सहयोगी बँकांची ४.७५ कोटी डेबिट कार्ड आहेत. ‘हॅकिंग’च्या घटनेनंतर बँकेने खंडित केलेल्या कार्डाचे प्रमाण ०.२५ टक्के आहे.

स्टेट बँकेच्या घटनेनंतर अन्य बँकांनीही खबरदारीचा उपाय म्हणून तिच्या ग्राहकांना पिन बदलण्याच्या सूचना केल्या आहेत.

खासगी क्षेत्रातील अ‍ॅक्सिस बँकेच्या व्यवहारांवरही सायबर हल्ला झाल्याचे कळते. बँकेची काही माहिती विदेशात हॅक केली जाण्याची शक्यता असून मात्र यामुळे बँकेच्या खातेदारांचे तसेच बँकेचे आर्थिक नुकसान झाले नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

देशातील तिसऱ्या क्रमांकाच्या खासगी बँकेने या घटनेची अर्न्‍स्ट अँड यंगमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. बँकेचा सव्‍‌र्हर विदेशातून हॅक केला गेल्याचे उघडकीस आले असले तरी रक्कम हस्तांतरित झाल्याची घटना अद्याप घडली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

बँकेच्या तांत्रिक यंत्रणेत अद्यापही ‘व्हायरस’ असून कोणतीही माहिती मात्र बाहेर गेलेली नाही, असा दावाही करण्यात आला आहे. अन्य बँकांप्रमाणेच अ‍ॅक्सिस बँकेलाही सुरक्षिततेविषयी इशारा मिळाला असून सर्व व्यवहारांवर देखरेख ठेवण्यात आल्याचे बँकेने नमूद केले आहे.

नेमके काय घडले?

स्टेट बँकेच्या खातेदारांच्या खात्यातून परस्पर रक्कम काढून घेण्याचे प्रकार विदेशात घडल्याचे प्रथम आढळून आले. हॅकर्सद्वारे ग्राहकांच्या कार्डाचा पिन हॅक करून खात्यातील रक्कम काढून घेण्याचा प्रकार घडल्याचे समजते. एकाच दिवसात दोनदा मोठी रक्कम खात्यातून गेल्याची तक्रार अनेक ग्राहकांनी बँकेकडे नोंदविली आहे. यानंतर स्टेट बँकेने संबंधित ग्राहकांना ‘तुमचे कार्ड ब्लॉक करण्यात आले आहे’ असे सूचित करत पिन बदलण्याविषयी तसेच नवा पिन घेण्याविषयी एसएमएस तसेच ई-मेलने कळविले होते. पिन बदलला नाही त्यांचे कार्ड ब्लॉक केले गेले.