देशातील सर्वात मोठय़ा भारतीय स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांसाठी मोबाइलद्वारे कैक प्रकारचे बँकिंग व्यवहार शक्य करणारे अ‍ॅप ‘बडी’ या नावाने प्रस्तूत केले. अर्थमंत्री अरुण जेटली, अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा, केंद्रीय वित्तीय सेवा सचिव हसमुख अधिया यांच्या उपस्थितीत मंगळवारी हा अनावरण सोहळा पार पडला. मोबाइल फोन हे येत्या काळात फार मोठय़ा संक्रमणाचे माध्यम ठरणार असून, या व्यासपीठावर आपले सेवा दालन आणखी मजबूत करण्यास या नव्या सुविधेतून सहाय्य मिळेल, असे याप्रसंगी बोलताना स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी स्पष्ट केले. अनेक प्रकारच्या देयकांचा भरणा, सिनेमा, विमान प्रवास तिकिटांचे आरक्षण, हॉटेल बुकिंग यासाठी केवळ मोबाइल फोनचा वापर या अ‍ॅपद्वारे शक्य होईल. अ‍ॅक्सेन्च्युअर आणि मास्टरकार्ड यांच्या सहयोगाने बनविलेले हे अ‍ॅपद्वारे व्यवहार सुरक्षित व विनासायास असण्याबरोबरच, त्यात देयकांचा भरणा करण्याच्या तारखांचे स्मरण करून देणारे गजर हे अतिरिक्त वैशिष्टय़ असल्याचे स्टेट बँकेने सांगितले.
दरम्यान खासगी क्षेत्रातील अग्रेसर आयसीआयसीआय बँकेनेही तिच्या सेवेतील डिजिटल संक्रमणाची चुणूक दाखविताना, मंगळवारी ‘स्मार्ट व्हॉल्ट’ नावाची नवीन सुविधा प्रस्तुत केली. या सुविधेचा विकास बँकेने भारतीय कंपन्यांच्या भागीदारीतूनच केला असल्याने, देशाने अवलंबिलेल्या  मेक इन इंडिया कार्यक्रमाच्या फलश्रुतीचेही उदाहरण प्रस्तुत करण्यात आले आहे, असे आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका व मुख्याधिकारी चंदा कोचर यांनी सांगितले. स्मार्ट व्हॉल्ट सुविधा म्हणजे व्यक्तिगत खातेदारांना महत्त्वाचे दस्तऐवज जतन करण्याचा व केव्हा-कधीही विनासायास उपलब्ध होणारा डिजिटल कुलूपबंद खण असून, बहुस्तरीय सुरक्षा प्रणाली आणि बायोमेट्रिक व पिनद्वारे शहानिशा करूनही ते उघडता येणार आहे. हे डिजिटल खण वेगवेगळ्या दोन-तीन आकारांत उपलब्ध करण्यात येणार असून, आकारमानानुसार या सुविधेसाठी शुल्क निश्चित करण्यात आले आहे.