रिझर्व्ह बँकेनं करोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रेपो दरता ०.७५ टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता त्या कपातीचा फायदा स्टेट बँकेनं आपल्या ग्राहकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट (EBR) आणि रेपो लिंक्ड लेंडिंग रेटशी (RLLR) निगडीत कर्जादारांना मिळणार आहे. ग्राहकांना १ एप्रिलपासून या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.

स्टेट बँकेनं वार्षित बेंचमार्क लेंडिंग रेटमध्ये कपात करून तो ७.८० टक्क्यांवरून ७.०५ टक्के केला आहे. तर रेपो लिंक्ड लेंडिंग रेटमध्येही कपात करून तो ७.४० टक्क्यांवरून ६.६५ टक्के इतका केला आहे. त्यामुळे कर्जधारकांना व्याजदर कपातीचा फायदा मिळणार आहे. ज्याचे गृहकर्ज याच्याशी जोडलेले आहेत त्यांना ३० वर्षांच्या ईएमआयवर प्रत्येकी १ लाख रूपयांना ५२ रूपयांचा फायदा मिळणार आहे.

एकीकडे स्टेट बँकेनं ग्राहकांना दिलासा दिला असला तरी दुसरीकडे मात्र फिक्स्ड डिपॉझिटवरूल व्याज दरात बँकेनं कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. नवे व्याजदर २८ मार्चपासून लागू होणार आहेत. रिटेल टाईम टर्म डिपॉझिच्या दरात निरनिराळ्या कालावधीसाठी २० बेसिस पॉईंट्स ते ५० बेसिस पॉईंट्सची कपात करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त बल्क टाईम डिपॉझिटच्या दरातही निरनिराळ्या कालावधीसाठी ५० बेसिस पॉईंट्स ते १०० बेसिस पॉईंट्सची कपात करण्यात आली आहे.