सलग आलेल्या सुट्टय़ांमुळे ग्राहकांचे हाल होऊ नये म्हणून स्टेट बँकेने शनिवार, ४ एप्रिलला शाखांमंधील अतिरिक्त दोन तासाने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या केवळ महाराष्ट्रातील शाखाच विस्तारित कालावधीत सुरू राहतील. शनिवारी एरव्ही बँकेचे कामकाज अर्धवेळ, चालते. शनिवारपूर्वी बँका सलग तीन दिवस बंद राहणार आहेत. बुधवार, १ एप्रिल रोजी अंतर्गत हिशेबांसाठी बँका बंद, तर २ व ३ एप्रिल रोजी अनुक्रमे महावीर जयंती व गुड फ्रायडेनिमित्त बँकांना सुटी आहे. या आधी सोमवारी बँका बंद होत्या. परिणामी बुधवारीच अनेक एटीएमसमोर ग्राहकांच्या मोठय़ा रांगा मुंबईत दिसून आल्या. महिन्याच्या ऐन सुरुवातीला आलेल्या बँक बंद प्रकारामुळे पगारदारांनाही खात्यात पगारही आलेला नाही. तर धनादेश वटणावळ लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. धनादेश वटणावळीच्या प्रक्रियेतील बँक कर्मचाऱ्यांनाही अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे सुटीची मागणी असल्याने २ व ३ एप्रिल रोजी धनादेश वटणावळ न करण्याचा पवित्रा युनियनने घेतला आहे.